संतोष गुरव - कऱ्हाडकरांपुढे दूषित पाण्याबरोबर कचऱ्याची समस्याही मोठी आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कचरा हटविण्यासाठी फक्त नियोजन केले जात आहे. कार्यवाही मात्र काहीच होत नसल्याचे दिसून येते. कचऱ्याची समस्या कधी मिटणार? असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे समस्यांमध्येही वाढ झाली आहे. अशुध्द पाणी, दुर्गंधीयुक्त वातावरण, अस्वच्छ परिसर, रस्त्यावरील खड्डे, धुरळा अशा परिस्थितीत कऱ्हाडकरांना आपले आयुष्य जगावे लागत आहे. वाढत्या कचऱ्याची सर्वांनाच चिंता लागून राहिली आहे. कचऱ्याचा प्रश्नही सध्या तेवढा महत्वाचा बनला आहे. कचऱ्यापासून होणारे आजार, रोगांमुळे नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येऊ लागले आहे. शहरातील कोल्हापूर नाका येथील प्रवेशद्वारापासून ते कृष्णानाक्यापर्यंत चारही बाजूने कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला देखील बाधा पोहोचत आहे. रस्त्याकडेला नाले, ओढे यामध्ये कचऱ्याचे ढिग साचत आहेत. या परिस्थितीला सर्वस्वी पालिकाच जबाबदार आहे. कचरा व्यवस्थापनाचे पालिकेचे नियोजनच चुकीचे असल्याचे नागरिक सांगत आहेत. दिवसभरात फक्त सकाळी एकदाच कचरा गोळा केला जातो. त्यानंतर दिवसभर कचरा गोळा केला जात नाही. त्यामुळे दिवसभर कचरा कचरा कुंड्यात पडून राहतो. काहीवेळा कुंड्या भरल्यामुळे कचरा इतरत्र विखुरतो. त्याचा त्रास कचरा कुंड्यांशेजारून जाणाऱ्या नागरिकांना होतो. कचरा कुंड्यांप्रमाणे पालिकेच्या घंटागाड्यांद्वारे कचरा एकत्र केला जात असताना घंटागाड्यांवरील कर्मचाऱ्यांकडून गाडी जास्त वेळ थांबविली जात नाही. ‘सायरन’चा आवाज करून गाडी एखाद्या २० ते ३० घरे असणाऱ्या कॉलनीमध्ये गेली की, त्या घरांतून गाडीत कुठला कचरा टाकला जाऊ नये, कुठला कचरा टाकावा याविषयी घंटागाडीवरील चालक सुचनाही करत नाहीत. वास्तविक कचरा टाकत असताना ओला व सुका असे विभाजन केल्यास कचरा कमी होऊ शकतो. मात्र तसे पालिकेकडून केले जात नाही. एकत्रित जमा झालेला कचरा शहरातून रस्त्यावरती सांडत डेपोपर्यंत नेला जातो. वाढत्या कचऱ्याबाबत पालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. पालिका कामाचा दिखावा करीत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. शहरात नगरपालिका हद्दीत २१४ लहान-मोठी रूग्णालय आहेत. त्यामधून दररोज विषारी मुदतबाह्य झालेली औषधे, रक्त मिश्रीत कापूस, इंजेक्शन सुया अशा प्रकारचा कचरा शहरातील कचरा कुंड्यांमध्ये टाकला जातो. या कचऱ्यामुळे आजार उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. रूग्णालयाप्रमाणे शहरातील शंभरहून अधिक हॉटेल, चायनिज, वडापाव विक्रेते व्यवसायीक यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात अन्न पदार्थांचा कचरा टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी तर होतेच. शिवाय सामान्यांना त्रासही सहन करावा लागतो. शहरातील भाजी मंडई येथील चांदणी चौक, कृष्णाबाई कार्यालय रोड, हटकेश्वर मंदिर, बापूजी साळुंखे पुतळा परिसर, मंगळवार पेठ, स्टेडियम परिसर, प्रभात टॉकीज, बाराडबरी परिसर, एस. टी. स्टँड परिसर, कर्मवीर चौक, कृष्णा नाका, पोपटभाई पेट्रोल पंप, जलशुध्दीकरण केंद्र, दूरध्वनी केंद्र परिसर याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठत आहे. पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यांच्या सतर्क राहण्याची मागणी होत आहे. दररोज ४० टन कचरा कऱ्हाड शहरातून दररोज ४० टन कचरा पालिकेकडून एकत्रित केला जातो. या कचऱ्याचे प्रमाण महिन्याला एक हजार दोनशे टन एवढे असते. त्या कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते का ? केली तर कशी केली जाते, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातून एकत्र होणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टीक कचऱ्याचे प्रमाण अधिक असते. याविषयी पालिका काहीच करत नाही. पालिकेने कचऱ्याबाबत अगोदर प्लास्टीक विक्रेता व वापर करणाऱ्यांवर बंदी घालत दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. - जालिंदर काशीद, अध्यक्ष, एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब, कऱ्हाड शहरातील नगरसेवकांनी वॉर्डनिहाय कचरा निर्मूलन समित्या स्थापन करून त्यातून प्रबोधन करावे. तसेच वॉर्डनिहाय पर्यावरण तज्ज्ञ, प्रदुषण नियंत्रण महामंडळ यातील अधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेऊन कचरा निर्मूलनाबाबत सविस्तर चर्चा करावी. - विवेक ढापरे, सामाजिक कार्यकर्ते
कऱ्हाड पालिकेच्या नियोजनाचा ‘कचरा’
By admin | Published: February 10, 2015 9:40 PM