कऱ्हाड : पाटण तिकाटणे पसिरात नागरिकांकडून रस्त्याकडेलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कचरा पडत असून, याबाबत संबंधित विभागाकडून काही कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येत आहे. कचऱ्यामध्ये अधुनमधून आग लागण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. मांस, अन्नपदार्थ तसेच घरगुती कचरा या ठिकाणी पडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या कचऱ्याच्या कोंडाळ्याभोवत श्वानही घुटमळत असतात. त्यामुळे रात्रीच्यावेळी या परिसरातून पायी प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. मोकाट श्वान नागरिकांवर हल्ला करीत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने कचरा हटवावा, अशी मागणी केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्गावर रिफ्लेक्टरची मागणी
मलकापूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर दिवसेंदिवस लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर धोकादायक ठिकाणी तातडीने रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी सूचना तसेच दिशादर्शक फलक आहेत. मात्र, या फलकांना झुडपांनी वेढा घातला आहे. त्यामुळे ते चालकांच्या दृष्टीस पडत नाहीत. दुभाजकात गवत वाढल्यामुळे हे फलक असून अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत आहेत. संबंधित विभागाने रिफ्लेक्टर आणि फलक लावण्याची मागणी होत आहे.
साथरोगाची शक्यता; गावोगावी जनजागृती
कऱ्हाड : सध्या वातावरणात बदल होत असल्याने साथरोग पसरत आहेत. या रोगांपासून बचाव करून आरोग्य जपण्याचा तसेच पाणी उकळून पिणे, नियमित औषधे घेण्याच्या सूचना डॉक्टरांकडून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दिल्या जात आहेत. दिवसा उकाडा व रात्रीच्यावेळी कडाक्याची थंडी पडत असल्याने सर्दी, ताप, खोकला असे आजार उद्भवत आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने सध्या रुग्णालयेही फुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच काही गावांमध्ये दूषित पाणी पुरवठ्यामुळे साथीचे आजार पसरले आहेत. ही परिस्थिती इतर गावात उद्भवू नये, यासाठी प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याबाबत योग्य ती दक्षता घेणे गरजेचे बनले आहे.
डोंगरपठारावरील विद्यार्थ्यांचा पायी प्रवास
पाटण : पाटण तालुक्यातील काही ग्रामीण भागात आजही रस्त्याच्या सुविधा नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. या तालुक्यातील काही गावे डोंगर, जंगल क्षेत्रात असल्यामुळे तेथे दळणवळण तसेच सुविधांची कमतरता आहे. याठिकाणी शासनाकडून आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाहीत. लोकप्रतिनिधीही मते मागण्यासाठी या विभागात जातात. त्यावेळी सुविधा पुरविण्याची पोकळ आश्वासने त्यांच्याकडून देण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात कसलीच कार्यवाही केली जात नाही. विद्यार्थ्यांचे हाल थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
कार्वे विभागामध्ये ऊस तोडींना आला वेग
कार्वे : शेरे, दुशेरे, कोरेगाव विभागातील ऊस तोडणीने वेग घेतला आहे. अनेक ठिकाणी मजुरांनी आपल्या झोपड्या घातल्या आहेत. पहाट होताच हे मजूर शिवाराचा रस्ता धरत आहेत. तसेच दिवसभर ऊसतोड करत थंडीमुळे रात्री लवकर परतत आहेत. शिवारात ऊस तोडीची लगबग सुरू असल्यामुळे शेतकरीही सकाळी लवकर शिवारात जात असून पुढील हंगामासाठी शेतीची मशागत करण्यात ते व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.