कऱ्हाड : अनेक ठिकाणी पाणी आल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जाते. दुकानांसमोर पाणी मारणे, वारंवार गाड्या धुणे अशा प्रकारे पाण्याची नासाडी केली जात असून, पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेने उपाययोजना करणे गरजेचे असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.
गतिरोधकाची गरज
कऱ्हाड : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावरील आगाशिवनगर परिसरात सतत रहदारी असते. त्यामुळे मार्गावर गतिरोधक निर्माण करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गतिरोधक नसल्यामुळे अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असतात. यावेळी नेहमी अपघात होत असतात. याची बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन गतिरोधक बसविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कापिल रस्त्याची दुरवस्था
मलकापूर : कापिल, ता. कऱ्हाड येथील हौदमळा परिसरात दाट लोकवस्ती आहे. मलकापूर शहरातून व कापिल गावामधून अशा दोन रस्त्याने हौदमळा परिसरातील ग्रामस्थांची ये-जा सुरू असते. सध्या दोन्हीही रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य झाले आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांसह या भागातील रहिवाशांची गैरसोय होत आहे. दुचाकीसह इतर वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे.
रिफ्लेक्टरची गरज
कोपर्डे हवेली : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व बैलगाड्यांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले नसल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनधारकांचा अंदाज चुकून अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी असे अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर बंधनकारक करणे गरजेचे आहे.