खंडाळा : सातारा जिल्ह्यासह राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळदृश परिस्थिती आणि पाणीटंचाईवर शासनपातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. नैसर्गिक जलस्त्रोतांचे जतन करणे, उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असताना जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे खंडाळा तालुक्यातील अजनूज येथील तरसखळी धरणाचे हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. धरणाच्या भिंतीला ग्रासलेली झाडेझुडपे तोडून पाण्याची गळती थांबविणे अत्यावश्यक आहे. याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांमधून होत आहे.अजनूज गावच्या पश्चिमेला डोंगराला लागून तरसखळी नावाचे धरण आहे. या धरणात वर्षभर पाणीसाठा असतो. त्यातच धोम बलकवडीच्या कालव्याचे पाणी पोटपाटाने या धरणात उतरते. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले जाते. मात्र या धरणाच्या भराव्यावर मोठमोठी झाडे उगवली आहे. तसेच मुख्य बंधाऱ्याला तडे गेल्याने पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या भराव्यावरून वाढलेल्या झाडांमुळे जाताही येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनाही येथे काहीच करता येत नाही.या धरणाच्या पाणीसाठ्यावर अजनूज, पारगाव, बावडा, खंडाळा, शिवाजीनगर या गावातील १२०० ते १५०० एकर जमीन ओलिताखाली आहे. सध्या या क्षेत्रामध्ये ऊस कांद्यासह रब्बी हंगामातील ज्वारी, हरभऱ्याच्या प्रमुख पिकासह अन्य पिकेही घेतली जात आहे. या धरणात योग्य पद्धतीने पाणीसाठा उपलब्ध राहिल्यास संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांना पाण्याची अडचण भासणार नाही.याशिवाय या गावांमधील व शेतीपाण्याच्या विहिरींची पाणीपातळीही वाढीस लागणार आहे. त्यासाठी धरणाची दुरुस्ती करून त्यातील गाळ काढल्यास पाणीसाठवण क्षमताही वाढेल.धरणाच्या दुरुस्तीबाबत व गळती काढण्याबाबत गावचे सरपंच मयूर भोसले यांनी खंडाळा येथे आमदार मकरंद पाटील व जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीतही मागणी केली होती. मात्र, त्यावर जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडून अद्यापतरी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. सध्या धोम बलकवाडीचे रोटेशननुसार पाणी कालव्याला सोडण्यात आले आहे. मात्र हे पाणी या धरणात न साठता खाली ओढ्याने वाहून जात आहे. असलेले पाणी विनाकारण वाया जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाबाबत नाराजीचा सूर आहे. तालुक्यात आत्ताच काही गावांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे. भविष्यात ही समस्या अधिक बिकट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठे जतन करण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी कधी डोळे उघडणार याकडेच जनतेचे लक्ष लागलेले आहे. या धरणाची तातडीने दुरुस्ती केल्यास साठल्या जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करता येणार आहे. (प्रतिनिधी)तरसखळी धरणाच्या पाण्यावर पाच ते सहा गावांच्या शेतीपाण्याच्या योजना अवलंबून आहेत. पावसाचे आणि धोम बलकवाडीचे पाणी साठण्याऐवजी त्याची गळती होत आहे. सांडव्यापर्यंत पाणी साठले जात नाही. त्यासाठी स्वच्छता, गाळ काढणे आणि दुरुस्तीची कामे तातडीने होणे गरजेचे आहे.- मयूर भोसले, सरपंच, अजनूज
तरसखळी धरण गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया
By admin | Published: December 11, 2015 12:02 AM