वाई : मांढरदेवच्या विकासासाठी लाखो रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. कोचर समितीने मांढरदेवच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. परंतु प्रशासनाकडून त्या पूर्णत्वास नेण्यासाठी कसलेही प्रयत्न केले जात नाहीत. वाई, शेंदूरजणे, भोर घाटाकडून मांढरदेवच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांची चाळण झाली आहे. तरीही बांधकाम विभाग ढिम्म अवस्थेत आहे. यात्रा आठ दिवसांवर येऊनही कामास गती नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. देवस्थान ट्रस्ट व प्रशासन संयुक्तपणे बैठका घेऊन लाखो रुपये या बैठकीच्या नावावर खर्च करीत आहे. सातारा-पुणे जिल्ह्यांतील प्रशासनाच्या सर्व विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची या बैठकीस उपस्थिती असते. बैठकीत घेतलेल्या एकाही निर्णयाची अंमलबजावणी अधिकारी करताना दिसत नाहीत. जर आढावा बैठक घेऊन यात्रेसाठीची ठरविण्यात आलेली कोणतीही कामे पूर्ण होत नसतील तर या आढावा बैठकींचा फार्स कशासाठी प्रशासन करते?, असा प्रश्न भाविकांमधून उपस्थित होत आहे. मांढरदेवच्या यात्रेसंदर्भात दोन आढावा बैठका झाल्या. परंतु बांधकाम विभागाने आजपर्यंत तालुक्यातील मांढरदेवकडे जाणाऱ्या रस्त्यांची कसलीही दुरुस्ती केलेली नाही. वाई, शेंदूरजणे, भोर घाटाकडून मांढरदेवच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांची चाळण झाली आहे. तरीही बांधकाम विभाग ढिम्म अवस्थेत आहे. वाईच्या औद्योगिक वसाहतीतून जाणाऱ्या रस्त्यावर अंदाजे पाच फूट रुंदीचे खड्डे पडले असून, या रस्त्यावरून वाहने जाताना रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता आहे, अशी अवस्था झाली आहे. महामार्गावरून सुरूरमार्गे शेंदूरजणे फाट्यावरून मांढरदेवकडे जाणाऱ्या रस्त्यावर एमआयडीसीपर्यंत तीन किलोमीटर अंतरापर्यंत जवळपास पाचशे खड्डे हे रस्त्यावर पडलेले आहेत. ते एवढे रुंद आहेत की भाविकांच्या वाहनांना रस्त्यावरील खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मोठे अपघात होऊन जीवित हानीही होण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्यावरून एमआयडीसी परिसर असल्याने मालवाहू वाहनांसह खासगी वाहनांची नेहमीच प्रचंड वर्दळ असते. मुंबई, पुणे, फलटण, बारामती, जुन्नर, कोल्हापूरसह कर्नाटकातून ही येणाऱ्या भाविकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. (प्रतिनिधी)
मांढरदेवला जाणाऱ्या भाविकांची वाट बिकट...
By admin | Published: January 02, 2017 11:15 PM