सातारा : सदर बझारमधील महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने सदर बझारमध्ये प्रचंड खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, यासाठी आता पोलिसांनी ड्रोनद्वारे वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील ३६ वर्षीय महिला कर्मचारी कोरोना बाधित सापडली. ही संबंधित महिला सदर बझार परिसरात वास्तव्यास आहे. त्यामुळे या परिसरावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. संपूर्ण सदर बझार परिसर चारीही बाजूंनी सील करण्यात आला आहे. एकही रस्ता खुला सोडला नाही. प्रत्येक रस्त्यावर, गल्लीबोळात आडवे बांबू लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच एखाद्या व्यक्तीला सदर बझारमध्ये प्रवेश दिला जात आहे. सातारा शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी ड्रोनद्वारे परिसरात चाचपणी केली.
संपूर्ण परिसर ड्रोनच्या माध्यमातून तपासण्यात आला. यावेळी काहीजण इमारतीवर घोळका करून बसलेले निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेतल्यानंतर संबंधित लोक घरात पळून गेले. शुक्रवारपासून सदर बझार परिसरामध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचबरोबरच सातारा शहरातही हीच परिस्थिती असणार आहे. विनाकारण घराबाहेर पडलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.