कऱ्हाड : वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने जीप पार्क केल्याप्रकरणी एका चालकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची घटना ताजी असतानाच वाहतूक शाखेने वाहतूक नियमांबाबतही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर शाखेने लक्ष केंद्रित केले असून, नियमांची मोडतोड करणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जात आहे. गेल्या चाळीस दिवसांत शाखेने ही मोहीम राबविली आहे. त्यातून आत्तापर्यंत साडेसहा लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.कऱ्हाडातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे आव्हान सध्या शहर पोलिसांसमोर आहे. त्यासाठी पोलिसांकडून प्रयत्नही केले जात आहेत. सध्या शहरातील रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. यापूर्वी रस्ते सुस्थितीत नसल्याने पोलिसांना वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यात अडचणी येत होत्या. मात्र, मध्यंतरी रस्त्याची कामे सुरू झाली. त्यावेळी अनेक रस्त्यांवर एकेरी तर काही रस्त्यांवरील वाहतूक वळविण्याचे काम पोलिसांना करावे लागते. या कालावधीतही पोलिसांनी वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी खास उपाययोजना केल्या. परिणामी, अनेक रस्त्यांवर काम सुरू असूनही वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले. सध्या ही कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे शाखेने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याबरोबरच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. नो-पार्किंगमध्ये पार्किंग, विनापरवाना वाहन चालविणे, विनापरवाना प्रवासी वाहतूक, फॅन्सी नंबरप्लेट, वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने वाहन उभे करणे, नो एन्ट्रीमध्ये वाहन चालविणे, सिग्नल तोडणे यासह अन्य प्रकारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर सध्या पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले आहे. गेल्या चाळीस दिवसांत अशा ३ हजार ८९ चालकांवर कारवाई करून पोलिसांनी तब्बल ६ लाख ५९ हजारांचा दंड वसूल केला आहे. शहरासह महाविद्यालय परिसरात पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे बेदरकार वाहन चालविणाऱ्यांना चाप बसला आहे. महाविद्यालयातील अनेक युवक सध्या दुचाकीवरून प्रवास करतात. मात्र, त्यातील काहीजण अल्पवयीन असतात. तसेच त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही नसतो. संबंधित युवक धूमस्टाईल दुचाकी चालवित असल्याने अपघाताची भीतीही वाढते. अशा चालकांवर वचक बसण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वाहतूक शाखेचे काही कर्मचारी दररोज महाविद्यालय परिसरात वाहनांची कसून तपासणी करीत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)प्रस्तावित वाहतूक आराखड्याचा पाठपुरावाकऱ्हाड शहर पोलिसांनी शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सुधारीत आराखडा पालिकेकडे दिला आहे. मात्र, निवडणुकीमुळे या प्रस्तावावर कोणताही निर्णय झाला नव्हता. सध्या निवडणूक पार पडली असून, नूतन पदाधिकारी पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे प्रस्तावित आराखड्यावर निर्णय होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी वाहतूक शाखेकडून पाठपुरावा केला जात असून, अन्य रस्त्यांवर एकेरीचा पर्याय करता येईल का, याचाही पोलिस विचार करीत आहेत.
कऱ्हाडातील वाहतुकीवर पोलिसांचा ‘वॉच’
By admin | Published: December 21, 2016 11:55 PM