मायणी : खटाव तालुक्यात १९७२ च्या दुष्काळात बांधण्यात आलेल्या कानकात्रे तलावातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. यामुळे ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. ऐन उन्हाळ्यात हे पाणी सुटल्याने उन्हाळी पिकांना फायदा होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील कानकात्रे (विठ्ठलनगर) गावाच्या पूर्व-उत्तर बाजूस १९७२ च्या दुष्काळामध्ये गावातील पिण्याच्या पाण्याची व शेती पाण्याची सोय व्हावी यासाठी रोजगार हमीतून या तलावाचे बांधकाम करण्यात आले होते. या तलावावर कानकात्रे, अनफळे तसेच ओढ्याच्या काठावर असलेली शेकडो एकर जमीन ओलिताखाली येत आहे.
गतवर्षी चांगला पाऊस झाला. या पावसामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. तसेच तलावाच्या सांडव्यापासून ते मायणी ब्रिटिशकालीन तलावापर्यंत अनेक लहान-मोठे दगड-मातीचे व सिमेंट काँक्रीटचे बंधारे बांधण्यात आले असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला होता. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामात फारसा पाण्याचा त्रास झाला नाही, पण आता उन्हाळी पिकांसाठी विहिरीची पाणी पातळी कमी झाली आहे.
तसेच बंधाऱ्यातील पाणी लागल्याने येथील अनिल सावंत, गणेश चव्हाण व ग्रामस्थांनी तलावातील पाणी शेतीसाठी सोडावे यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकरी व ग्रामस्थांची मागणी पूर्ण करून शेतीसाठी पाणी सोडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्याचा उन्हाळी पिकांसाठी फायदा होणार आहे.
११मायणी-कानकात्रे तलाव
कानकात्रे (विठ्ठलनगर) येथील तलावातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. या वेळी ग्रामस्थ उपस्थित होते. (छाया : संदीप कुंभार)