वाई : पाणी म्हणजे जीवन असे म्हणतात. कारण दूषित पाण्यामुळे अनेक आजार होतात. त्यामुळे स्वच्छ व शुद्ध पाणी पिणे हितकारक असते. असाच विचार करून वाईतील महर्षी शिंदे विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाण्याची वॉटर बँक तयार करण्यात आली आहे. त्यासाठी एका बँकेने अर्थसहाय्य केले आहे. त्यामुळे संबंधित मशीनमध्ये २ हजार लिटर शुद्ध पाणी साठवणूक होणार आहे. तसेच ८०० विद्यार्थ्यांना पाणी मिळणार आहे. शेतामध्ये रासायनिक खतांचा व औषधांचा वारेमाप वापर होत आहे. तसेच औद्योगिकीकरणात झपाट्याने वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणावर हवेत कार्बन डायआॅक्साईड व इतर विषारी वायू सोडले जात आहेत. तसेच कारखान्यामधून सोडले जाणारे दूषित केमिकल मिश्रित पाणी यांचा एकत्रित परिणाम म्हणून पिण्याचे पाणी हे कमालीचे दूषित झाल्याचे दिसत आहे. पाणी हा घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. निरोगी राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी प्यावे लागते; परंतु हे पाणीच जर दूषित असेल तर यामुळे अनेक आजार होऊ शकतात. आरोग्यासाठी संजीवनी समजले जाणारे पाणी हे विष सिद्ध होऊ शकते. त्यामुळे अलीकडच्या काळात शुद्ध पाण्याचे महत्त्व वाढले आहे. शुद्ध पाण्याचे महत्त्व ओळखून वाई येथील महर्षी शिंदे विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी देण्याचा निश्चय मुख्याध्यापक बी. ए. पाटील व शिक्षक विजय मागळी यांनी केला. या विद्यालयात वाई शहरातील व ग्रामीण भागातून सुमारे ८०० मुले-मुली शिक्षणासाठी येत असतात. आपल्या विद्यालयातील ही मुलांना शुद्ध पाणी प्यायला मिळावे व त्यांचे आरोग्य निरोगी राहावे, या हेतूने प्रेरित होऊन हा प्रकल्प करण्याचे योजले. त्यांच्या या प्रयत्नाला दि बुलढाणा कॉ. बँकेने संपूर्ण अर्थिक सहकार्य केले. साधारणपणे २ लाख ५० हजारांचा हा प्रकल्प मोफत व सेवाभावी वृत्तीने बुलढाणा बँकेच्या सहकार्याने झाला. (प्रतिनिधी)मी पहिल्यापासून विद्यार्थी पितात तेच पाणी पितो. अनेक आजार हे दूषित पाण्यामुळेच होत असतात. विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे व त्यांचे आरोग्य निरोगी राहावे, या उद्देशाने आम्ही प्रयत्न केले आणि त्याला बुलढाणा अर्बन बँकेने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे हा प्रकल्प होऊ शकला. - बी. ए. पाटील, मुख्याध्यापक आम्ही परगावावरून येत असतो. घरून पाणी आणवे लागत असल्याने दप्तराचा बोजा जास्त होत असे. आम्ही आणलेले पाणीही पुरेसे पडत नाही. आता आम्हाला विद्यालयात पुरेसे शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळत असल्याने आमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे.- प्रताप सोनावणे, विद्यार्थी
महर्षी शिंदे विद्यालयात शुद्ध पाण्याची वॉटर बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2016 8:28 PM