वाठार स्टेशन : धोम पाटबंधारे विभागाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणी व्यवस्थेची वीज विद्युत ट्रान्सफार्मर चोरीला गेल्यामुळे बंद आहे. चोरीला गेलेले ट्रान्सफार्मर जोडण्यासाठी परिसरातील शेतकरी तीन महिन्यांपासून हेलपाटे मारत आहेत. तर दुसऱ्या बाजूने धोमचे पाणी उचलण्यासाठी अभियंत्याची परवानगी असेल तरच कनेक्शन जोडणार असल्याची अट महावितरण ने घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘आई जेवू देईना, बाप भीक मागू देईना,’ अशी झाली आहे.वाठारस्टेशन महावितरणच्या या अधिकाऱ्याला धोम पाटबंधारे अभियंत्यानी या ठिकाणच्या मोटारी जोडण्याबाबत पत्र देऊनही हे बेशिस्त अधिकारी वीज जोडणीबाबत टाळाटाळ करत असल्याने ‘महावितरण’च्या विरोधात हे शेतकरी एकवटले आहेत. त्यांच्यात नाराजी असून महावितण विरोधात महामोर्चाचे आयोजन करण्याचा इशारा प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे. अंबवडे (सं) वाघोली, रेवडी येथील शेतकऱ्यांनी शेती पाण्यासाठी रेवडीजवळ असलेल्या धोम कालव्यातून पाणी परवाना घेतला आहे. दोन गावांतील जवळपास ३०० ते ४०० एकर शेतीसाठी या ठिकाणाहून पाणी उपसा केला जात आहे. या सर्वांसाठी या ठिकाणी तीन विद्युत ट्रान्सफार्मर जोडण्यात आले आहेत. दोन महिन्यांपूर्वी या डिपी चोरीस गेल्याने या डिपी जोडाव्यात, यासाठी हे शेतकरी ‘महावितरण’चे उंबरठे झिजवत आहेत. सद्यस्थितीत रेवडी कॅनॉलमधील पाणी सोडण्यात आले असतानाही वीज नसल्याने शेकडो एकर बागायती शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दुसऱ्या बाजूने या कॅनॉलचे पाणी १० ते १५ दिवसच राहणार असल्याने या ठिकाणी विद्युत ट्रान्सफार्मर जोडून शेतकऱ्यांना वीज जोडणी जोडण्याबाबत तत्काळ कार्यवाही व्हावी, अशी मागणी होत आहे.वाठार स्टेशन महावितरणच्या कारभारामुळेच यापूर्वी मोठ्या स्वरूपाचे उठाव झाले होते. आजही महावितरणची परिस्थिती तशीच असल्याने यात सुधारणा होण्याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. दरम्यान, ही परिस्थिती अशीच राहिली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)अंबवडे गावातील २०० ते ३०० एकर क्षेत्र रेवडी कॅनॉलवर अवलंबून आहे. या क्षेत्रासाठी रेवडी कॅनॉलजवळ असलेले तीन विद्युत ट्रान्सफार्मर दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेले आहेत. त्या अद्याप बसविल्या नसल्याने या शेतातील उसाचे पीक जळून चालले आहे. - संभाजी सकुंडे, शेतकरीरेवडी कॅनॉलवर असलेला डिपी जोडल्यास शेतकऱ्यांच्या मोटारींना तत्काळ कनेक्शन देण्याबाबत आम्ही संबंधित महावितरण अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे.-सुनील गोडसे, उपअभियंता, धोम कालवारेवडी ठिकाणी असलेले डिपी चोरीस गेल्यानंतर ज्यावेळी आमच्याकडे उपलब्ध होतील. त्यावेळी जोडण्यात येतील. मात्र, यासाठी धोम पाटबंधारे विभागाचा परवाना मला मिळालेला नाही.-मंचरे, उपअभियंता महावितरण, वाठारस्टेशन.
कालव्यात पाणी; बळीराजा अनवाणी !
By admin | Published: December 11, 2015 12:04 AM