ज्या तालुक्यात दोन-चार वर्षांतून दुष्काळ पडायचा. माणसांना आणि जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. टँकरवर अवलंबून रहावे लागे. जिल्ह्यातील अशा माण, खटाव, कोरेगाव तालुक्यातील गावांना पाण्याची श्रीमंती कळली. त्यातूनच जलसंधारण आणि लोकसहभागातून वॉटर कप स्पर्धा घेतली. माळरानावर टिकावाचे घाव घातले अन् कोट्यवधीची कामे केली. त्यानंतर निसर्गानेही साथ दिली. वाहून जाणारे पाणी अडले. त्यामुळे दुष्काळी अनेक गावांतून टँकर हद्दपार झाला. लोकवर्गणीतून झालेला हा कायापालट गावांना पाणीदार करून गेला अन् जलश्रीमंती आली.
जिल्ह्यातील पूर्व भाग दुष्काळी. वार्षिक पर्जन्यमान ३०० ते ४०० मिलिमीटर, तरीही दरवर्षी एवढा पाऊस पडेलच, असे नाही. त्यामुळे डिसेंबर उजाडताच गावागावातून टँकरची मागणी व्हायची. वर्षानुवर्षे हे चित्र चालत आलेले. पण, हे बदलण्याचे लोकांनी ठरवले. त्यासाठी ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ पूरक ठरली तर दुसरीकडे जलसंधारणाचे कामही महत्त्वपूर्ण ठरले.
२०१६पासून सलग चार वर्षे वॉटर कप स्पर्धा माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात सुरू झाली. उन्हाळ्यात ही स्पर्धा सुरू व्हायची अन् उन्हाळ्यातच संपायची. या स्पर्धेसाठी सकाळी-सकाळी गाव माळरानावर जायचे अन् ओसाड माळरानावर टिकावाचे घाव घालायचे. यामध्ये ज्येष्ठ सहभागी होत. तसेच पुरुषांबरोबर महिला आणि तरुणही हिरिरीने सहभागी व्हायचे. मग काय कामाला गती यायची. उन्हाळ्यात घाम गाळत डोंगरात एवढे कामही सुलभ होत असे. त्यातच गावांनी लोकवर्गणी काढली. मुंबई, पुणे तसेच इतर भागातील चाकरमानीही यात सहभागी व्हायचे. कधी यंत्रांनी कामे केली जायची. यातून सीसीटी, डीपसीसीटी, गाबियान बंधारे, नालाबांध दुरुस्ती, तलाव बांधणे, गाळ काढणे अशी कामे झाली. बघता-बघता चार वर्षांत कोट्यवधींचे काम झाले. माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांतील जवळपास १९० गावांमध्ये हे काम उभे राहिले.
जलसंधारणाचे काम झाल्यानंतर सलग दोन वर्षे दुष्काळी तालुक्यात निसर्गानेही साथ दिली. उच्चांकी पाऊस झाला. त्यामुळे वाहून जाणारे पाणी अडले. जमिनीत मुरले. मग, काय ग्रामस्थांच्या कष्टाला फळ आले. जी गावे उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करायची. घागरभर पाण्यासाठी टँकरची वाट बघत, तिथे आज मुबलक प्रमाणात पाणी आहे. केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर शेतीसाठीही पाणी उपलब्ध झाले. माळरानावरही कलिंगड, डाळिंब येऊ लागले. त्यातून अर्थकारण सुधारले. ही सर्व किमया पाण्याने केली. यात ग्रामस्थांचे कष्टही महत्त्वपूर्ण ठरले हे ही तितकेच खरे !
चौकट :
अजूनही कोठेही टँकर नाही...
दुष्काळी तालुक्यात पूर्वी झरे, आड, विहिरीतील पाण्यावर लोकांची तहान भागायची. कालांतराने पाणी योजना राबविण्यात आल्या. पण, उन्हाळ्यात बहुतांशी योजना पाणी नसल्याने बंद पडायच्या. मग काय टँकर सुरू व्हायचा. तरीही दोन-दोन दिवस टँकर यायचा नाही. माणसाबरोबरच जनावरांनाही हाल सोसावे लागत असत. पण, जलसंधारण आणि वॉटर कपमुळे ही परिस्थिती सुधारली. आजही दुष्काळी तालुक्यात कोठेही टँकर सुरू नाही. पाण्याची उपलब्धता झाली. गावांनीच आपल्या संकटावर मात केली तसेच जलसमृद्धता आणली. त्यामुळे पाण्याचा प्रश्न खऱ्याअर्थाने निकालात निघाला आहे.
फोटो मेल...
20satara watar photo...
.........................................................................