कोरेगाव : मतदारसंघातील लोकांना पाणी कमी पडू नये यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. कोरेगाव आणि खटाव तालुक्यात स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरु केले असून, जलसंधारणाच्या कामासाठी स्वनिधीतून जयवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून कामे हाती घेतली जाणार आहेत, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. मोळ, ता. खटाव येथे जलसंधारणाचे काम हाती घेतले असून, मशिनरीसाठी आवश्यक निधी जयवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आ. शिंंदे यांनी उपलब्ध करुन दिला आहे. त्याचा धनादेश त्यांनी नुकताच ग्रामस्थांकडे सुपूर्द केला. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. जलसंधारणाची कामे हाती घेतली असतानाही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु ठेवणे क्रमप्राप्त आहे. टंचाईची दाहकता वाढत चालली असल्याने टँकर कमी पडत आहेत. लोकांसाठी स्वनिधीतून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कोरेगाव आणि खटाव तालुक्यामध्ये नदी, ओढे आणि नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. लोकसहभागातून कामे करत असताना स्वनिधीतून लागेल ते सहकार्य केले जाणार आहे, असे स्पष्ट करुन आ. शिंंदे म्हणाले की, कोरेगाव मतदारसंघामध्ये जेथे पाणी पोहोचत नाही, त्याठिकाणी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी कामाला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
जलसंधारणाची कामे स्वनिधीतून करणार
By admin | Published: May 08, 2016 9:02 PM