आदर्की : बिबी गावच्या परिसरात कारखान्याची मळी, डिस्टिलरीचे पाणी सोडल्याने पाणी दूषित होत असल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. कोणीही कोणत्याही कारखान्याची मळी किंवा दूषित पाणी सोडल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.
बिबी, ता. फलटण येथील ऑनलाइन ग्रामसभा सरपंच प्रीती काशीद यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी ग्रामसेवक हणमंत चव्हाण यांनी ग्रामसभेपुढील विषयाचे वाचन केले.
सभेमध्ये दारू, मटका, मळी यावर चर्चा झाली.
मोहन बोबडे यांनी मदनेवस्ती येथे पाणीटंचाई निर्माण झाल्याचे सांगितले. यावर ग्रामसेवक चव्हाण यांनी हातपंप घेण्याचा प्रस्ताव दिला आहे; पण भूजल सर्वेक्षण विभागाने मनुष्यबळ नसल्याने उशीर होत आहे; पण लवकरच खासगी लोकांकडून सर्वेक्षण करणार असल्याचे सांगितले.
कृषी सहायक गोविद शिंगाडे यांनी फळभाग, नापेड, यांत्रिकीकरण यांची माहिती दिली. शासनाने कृषी समिती निवडीची माहिती मागविल्याने ग्रामपंचायत सदस्यांबरोबर चर्चा करून शासनाला दिली आहे. त्यास ग्रामसभेने मंजुरी देण्याची मागणी केली.
त्यावेळी सुभाष बोबडे यांनी समिती सदस्यांची यादी वाचून दाखविण्यास सांगितले. अप्पासाहेब मोरे यांनी गावात कोरोना संसर्ग वाढत असून, गावात सर्वेक्षण करण्याची सूचना मांडली. यावेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य
कर्मचारी, ग्रामपंचायत सर्वेक्षण सुरू केले. संशयित रुग्ण किंवा पॉझिटिव्ह रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल न झाल्यास पोलीस स्टेशनला कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना प्रीती काशीद यांनी सर्वांच्या सहकार्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना विलगीकरण कक्ष सुरू केला आहे.
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पंचवीस टक्के निधी त्यावर खर्च करण्यात येणार आहे; पण शासनाच्या मार्गदर्शक सूचना आल्या नाहीत.
विहिरीवर झाकण टाकणे, नळ पाणीपुरवठा योजना आदींवर खर्च करण्यात येणार आहे. कामासंदर्भात ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याचे आवाहन
केले. ऑनलाइन ग्रामसभेत उपसरपंच सचिन बोबडे, अप्पासाहेब मोरे, विशाल बोबडे, अमोल बोबडे, विजय बोबडे, बबन बोबडे, रावसाहेब बोबडे आदी ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.