कायम दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेला, ज्यांच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेला आहे, अशा माण तालुक्यात कोठेतरीच हिरवळ दिसते, नाही तर जळून गेलेली पिकं दिसतात. या भागात शेती करणं म्हणजे जुगार समजला जातो. याच मातीतील पळशी येथील गोरखनाथ यादव यांचे धाडस काहीसे वेगळेच होते. पुणे विद्यापीठातून इंग्रजी विषयाची उच्च पदवी संपादन केल्यानंतर एका कंपनीत दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर माण तालुक्यातील एका शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कामही केले; पण लहानपणापासून शेती करण्याची आवड त्यांना नोकरीत स्वस्थ बसू देत नव्हती अन् त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे वडिलोपार्जित वीस एकर शेती आहे. पण त्यातील बहुतांश शेती जिरायत आहे. तीन विहिरी आहेत. मात्र, सततच्या दुष्काळामुळे पाणीपातळी खालावलेली. तरीही हिमतीने शेती करण्याचे ठरविले. सव्वा गुंठा जागेत कांद्याची लागवड केली. त्यातून गोखनाथ यादव यांना थोडथोडके नाही तर चक्क दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. लॉटरीसारखा आलेल्या पैशांचा सदुपयोग करत त्यांनी वडिलांनी घेऊन ठेवलेले कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकप्रकारे कर्जाचा डोंगर कमी झाला. कांदा पिकाबरोबरच त्यांनी ज्वारी, बाजरी, गहू, भाजीपाला यासारखी पिके घेतली आहेत. भाजीपाला विक्रीतून चांगले उत्पन्न निघत आहे. शेती करत असतानाही त्यांनी रासायनिक खताला बगल देत सेंद्रिय शेती, शेणखताचा वापर करत आहेत. त्याचप्रमाणे नवनवीन प्रयोग करून दुष्काळी माण तालुक्यातही योग्य नियोजन केले तर आदर्श शेती करता येते, हे समाजाला दाखवून देण्याचा संकल्प पळशी येथील गोरखनाथ यादव केला आहे. लहानपणापासून शेतीची आवड असल्याने नोकरीच्या मागे न धावता शेती करण्याचा निर्णय तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांसाठी आदर्श घालून देत आहे.
कांदा शेतीसाठी नोकरीवर पाणी
By admin | Published: January 03, 2016 11:28 PM