सातारा : रब्बी हंगामाची पेरणी सुरू असतानाच साताऱ्यासह शेजारील जिल्ह्यातही दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी पाणी विसर्गाची मागणी होत आहे. पण, पर्जन्यमान कमी झाल्याने धरणांतच पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे आगामी आठ महिन्यांचा विचार करता पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.मान्सूनचा पाऊस वेळेत आणि चांगला झाला तरच खरीप आणि रब्बी हंगामही पदरी पडतात. पण, यावर्षी मान्सूनच्या पावसाने घात केला. उशिरा सुरुवात आणि त्यानंतर वारंवार दडी होती. त्यातच जून ते सप्टेंबरपर्यंतच्या चार महिन्यात सरासरीच्या ६० टक्क्यांवरच पाऊस झाला. तसेच जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. यामुळे दुष्काळीस्थिती निर्माण झालेली आहे. अशातच आता शेतकरी रब्बी हंगामातील पेरणी करत आहेत. त्यामुळे पिकांनाही पाणी लागणार आहे. परिणामी धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
सातारा जिल्ह्यात प्रमुख मोठे सहा पाणी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीवर आहे. यामधील कोयना धरण हे १०५.२५ टीएमसी क्षमतेचे आहे. या धरणातील पाण्यावर अनेक गावांची तहान भागते. तसेच टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन पाणी योजनाही अवलंबून आहेत. अशातच सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी झाली. त्यामुळे शुक्रवारपासून पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पण, गेल्या दीड महिन्यात कोयनेतून सांगलीसाठी तीनवेळा पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे आगामी काळातही सिंचनासाठी मागणी वाढणार असल्याने कोयना धरणातील साठ्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.कोयना धरणातील पाणी सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी जाते. तसेच सातारा आणि सोलापूर जिल्ह्यालालाही सिंचनासाठी पाणी सोडले जाते. सध्या कोयना धरणात ८९ टीएमसीच पाणीसाठा आहे. त्यात वीजनिर्मिती आणि शेती पाण्याचा विचार करता पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. तर ९.९६ टीएमसीच्या उरमोडी धरणावर सातारसह माण आणि खटाव या तालुक्यातील सिंचन योजना अवलंबून आहेत. सध्या धरणात ५.८६ टीएमसीच पाणी आहे. हे पाणी पुरवताना पुढील आठ महिन्यांचा विचार करावा लागणार आहे. धोम-बलकवडी धरणातील पाणीही फलटण तालुक्यातील सिंचनासाठी सोडण्यात येते. या धरणातही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात सिंचनासाठी पाणी मोठ्या प्रमाणात सोडावे लागणार असल्याने धरणे लवकरच खाली होण्याची भीती आहे.कोयनेबरोबरच उरमोडीतूनही विसर्ग..
सातारा तालुक्यातील उरमोडी धरण दुष्काळी भागासाठी वरदानच ठरले आहे. या धरणातील पाण्यावर माण आणि खटाव या दोन्ही तालुक्यातील हजारो एकर शेती सिंचनाखाली येते. सध्या या धरणातून १७५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीत करण्यात येत आहे. हे पाणी सिंचन आणि पिण्यासाठीही जात आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील धोका लक्षात घेता साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाटबंधारे विभागबरोबर बैठक घेऊन उरमोडीतील साताऱ्याच्या वाटणीचे पाणी कोणालाही देऊ नये, अशी सूचना केली आहे. यावरुन यंदा कमी पाणीसाठ्यामुळे सर्वच धरणांतील पाण्याचे महत्व वाढले आहे.