लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना उपचाराचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आयसोलेशन कक्षात असलेल्या बाधित रुग्णांना गत चार दिवसांपासून पिण्याचे पाणी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या बाधित रुग्णांना चक्क बिस्लरी विकत आणून पाणी प्यावे लागत आहे. याला सर्वस्वी वॉर्डबॉय जबाबदार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा रुग्णालय गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ७ आयसोलेशन कक्ष, तसेच ३ आयसीयू कक्ष आहेत. यातील मेट्रो ब्लड बँकेसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयसोलेशन कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षातच चार दिवसांपासून बाधित रुग्णांना पिण्यासाठी पाणी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बाधितांनी या कक्षात असलेल्या नर्स, वॉर्ड बॉय, डॉक्टर यांना वारंवार ही बाब निदर्शनास आणून दिली असतानाही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे.
या कक्षात फक्त पाण्याची मोकळी टाकी आणून ठेवली आहे. चार दिवस पाणी नसल्याने हे रुग्ण आपले नातेवाईक किंवा या कक्षाच्या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना पैसे देऊन चक्क बिस्लरी विकत आण्याला लावून बिस्लरीचे पाणी पित आहेत.
कोट : जिल्हा रुग्णालयात पाण्याची गैरसोय नाही. पाणी सोडणारे वॉर्ड बॉय कमी-जास्त पाणी सोडत असल्याने पाण्याची टंचाई जाणवत आहे. संबंधित वॉर्ड बॉयला सूचना देऊन पाणीपुरवठा सुरळीत कसा होईल, याकडे लक्ष देण्यात आले आहे.
याबाबत संबंधित वॉर्डच्या डॉक्टरांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.
-डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक.