सातारा :कर्नाटक शासनाने पिण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आदेश मिळाल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून एक टीएमसी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. तर सध्या पायथा वीजगृह, सिंचन आणि पिण्यासाठी मिळून धरणातून एकूण ४२०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू झाला आहे.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. दरवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात धरण भरते. या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. तसेच, सिंचन आणि पिण्यासाठी पाणीही सोडले जाते. उन्हाळ्यात ही मागणी अधिक वाढत जाते. त्याप्रमाणात पाणी विसर्ग केला जातो. सध्या धरणात ३८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एक महिन्यानंतर मान्सूनला सुरुवात होईल. तोपर्यंत हे पाणी पुरवावे लागणार आहे.
त्यातच सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातील दोन्ही युनिट सुरू आहेत. त्यामुळे २१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर नदी विमोचकातूनही पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत होते. असे असतानाच कडक उन्हामुळे पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापन मागणीनुसार पाणी सोडत आहे. असे असतानाच आता कर्नाटक शासनाने पिण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
कर्नाटकने तीन टीएमसीची मागणी केली असलीतरी त्यापैकी एक टीएमसी पाणी सोडण्याबाबतचा आदेश धरण व्यवस्थापनला मिळाला आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री आठपासूनच कर्नाटकसाठी पिण्याच्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदी विमोचकाद्वारे हे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे विमोचकातून आता २१०० आणि पायथा वीजगृह २१०० असा मिळून कोयना धरणातून ४२०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू झाला आहे.