संदीप कुंभारमायणी : गेल्या दोन दशकांपासून अधिककाळ प्रतीक्षेत असलेल्या खटाव पूर्व भागांमधील धोंडेवाडीसह नऊ गावांमध्ये सोमवारी तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी आल्यामुळे या गावातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण झाले.तारळी प्रकल्प दुष्काळी भागातील गावांच्या पिण्याची व शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी निर्मिती करण्यात आली होती. या प्रकल्पाअंतर्गत असणाऱ्या विविध गावांचे पुनर्वसन खटाव तालुक्यात विविध ठिकाणी करण्यात आले आहे. मात्र, गेल्या दोन दशकांपासून या प्रकल्पाच्या कामात अनेक अडथळे येत होते. यामध्ये प्रामुख्याने कधी जमीन अधिग्रहण तर कधी निधीची टंचाई निर्माण होत होती.तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी खटाव तालुक्याच्या पूर्व भागात देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कालव्यांची कामे ही दोन दशकांपासून सुरू होती. म्हणजे गेली दहा वर्षे या कालव्यांची कामे सुरूच आहेत.
यामध्ये प्रामुख्याने धोंडेवाडी येथील जलसेतू सुमारे ४६८ मीटर लांबीचा असून, यामध्ये १५ मीटर अंतराचे ३१ गाळे आहेत तर जमिनीपासून या जलसेतूची उंची ५ ते १२ मीटर इतकी आहे. दीड बाय दीड मीटर अंतरातून जलसेतूचे काम सुरू होते. अनेक अडथळे निर्माण होत गेली आणि विविध कारणांमुळे या भागात पाणी देण्यासाठी हा सर्वात मोठा अडथळा उभा होता. मात्र, परिसरात गतवर्षीपासून सुरू असलेल्या जनआंदोलनमुळे काम पूर्ण झाले.या उपसा सिंचन योजनेचे पाणी द्यावे, यासाठी गेल्या जानेवारी महिन्यापासून या धोंडेवाडीसह मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी या नऊ गावांतील ग्रामस्थ जनआंदोलन करत होते. यामध्ये रस्ता रोको, निवेदन, अधिकाऱ्यांच्या भेटीत सातत्य राहिल्यामुळे व भागातील माजी आ. प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुुुुदगे, हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, नंदकुमार मोरे, विजय शिंदे यांच्या प्रयत्नातून या भागात आज पाणी आल्यामुळे या भागातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान निर्माण झाले.
गेल्या तीन महिन्यांपासून या पाण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अधिकाऱ्यांकडून ही सकारात्मकता मिळत नव्हता. पाणी सोडायचे कसे येथून पाणी सुटेपर्यंत संघर्ष करावा लागला. पाणी सुटले त्यानंतर पुरेसा दाब नसल्याने पाणी पुन्हा बंद झाले. त्यामुळे पाणी येते का नाही? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, जनआंदोलनामुळे हे पाणी धोंडेवाडीसह नऊ गावांच्या शिवारात दाखल झाले आहे.-हणमंत भोसले, उपसरपंच, धोंडेवाडी, खटाव