सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळीस्थिती आहे. यामुळे कोयनेतील पाण्यावरुन सांगली जिल्ह्याने आक्रमक पवित्रा घेतला असतानाच आता कण्हेर, उरमोडी धरणातील पाण्याबाबत सातारा, काेरेगाव आणि कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी आंदोलन करणार आहेत. साताऱ्यातील पाटबंधारे विभागात मंगळवारी धडक देणार आहेत. त्यामुळे धरणांतील पाणी पेटण्याची चिन्हे आहेत.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाला नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. या भागात जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तीन ते पाच हजार मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो. याच भागात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयनासारखे धरण आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीमएसी इतकी आहे. तर पश्चिम भागातच कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी अशी मोठी धरणेही आहेत. या भागातील प्रमुख सहा धरणांची पाणीसाठवण क्षमता तब्बल १४८ टीएमसी इतकी आहे. तर पश्चिम भागातच अनेक छोटी धरणेही आहे. त्याचाही खूप मोठा फायदा होत असतो.
या धरणांतील पाण्यावर पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच सिंचन योजनाही आहेत. यासाठी पाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आवर्तनानुसार पाणी सोडण्यात येते. आतापर्यंत सिंचनासाठी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत वाद झाले नाहीत. पण, यावर्षी धरणातील पाणी पेटण्याची चिन्हे आहेत. याला कारण अपुरे पर्जन्यमान.
जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पाऊस झाला होता. मान्सूनचा पाऊस तर अवघा ६५ टक्केच बरसला. जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ८८६ मिलीमीटर पाऊस पडतो. पण, ५७९ मिलीमीटरच पाऊस पडला. यामुळे तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट झाली. त्यानंतर परतीचा पाऊसही अपेक्षित झाला नाही. परिणामी प्रमुख धरणे भरली नाहीत. त्यामुळे गेल्यावर्षी नाेव्हेंबर महिन्यापासून सिंचनाच्या पाण्यासाठी मागणी होऊ लागली. कोयना धरणातून आतापर्यंत अनेकवेळा सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. यावरुन सांगली आणि सातारा जिल्ह्यातील राजकीय वाकयुध्द रंगले आहे. कारण, कोयनेतील पाणी जूनपर्यंत पुरविण्याचे नियोजन आहे.
यापार्श्वभूमीवर कोयना धरण भरले नसल्याने पाण्यावरुन सतत संघर्ष सुरू आहे. असे असतानाच आता जिल्ह्यातील कण्हेर, उरमोडी, धोम धरणातील पाण्यावरुन संघर्ष उद्भभवू पाहत आहे. सातारा, कोरेगाव आणि कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी आक्रमक पवित्र्याच्या भूमिकेत आहेत. यासाठी दि. २३ जानेवरी रोजी साताऱ्यातील कृष्णानगरच्या पाटबंधारे विभागात जाऊन बेकायदेशीर सोडण्यात येणारे पाणी थांबवावे, अशी मागणी करत शेतकरी अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत. यामुळे धरणांतील पाणी पेटण्याचीच चिन्हे आहेत.
कण्हेर, उरमोडी धरणातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा वापर बेकायदेशीररित्या होत आहे. सातारा, कोरेगाव, कऱ्हाड आदी तालुक्यात दुष्काळ असतानाही कृष्णा नदीतून जिहे-कटापूर योजनेचे पाणी पळवले जात आहे. याविरोधात वारंवार आवाज उठवला. पण, आता राजकीय झेंडे बाजुला ठेवून एकत्र येणार आहे. यासाठी दि. २३ जानेवारी रोजी कृष्णा सिंचन भवनमध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे. तसेच बेकायदेशीर सोडण्यात आलेले पाणी बंद करायला लावणार आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना