सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस असून २४ तासांत कोयनाला १६४ तर नवजा येथे १४५ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या एक युनीट सुरू असून त्यातून १ हजार ५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसांपासून पावसाने जाेर धरला आहे. आभाळ फाटल्यासारखा पाऊस होत आहे. यामुळे ओढे-नाले एक होऊन वाहत आहेत. तसेच कोयना धरणक्षेत्रातही दमदार पाऊस होऊ लागला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत चालली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १६३ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. तर महाबळेश्वरला १४० मिलीमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत कोयनेला २ हजार ७३२ आणि नवजा येथे ३ हजार २२८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर कोयना धरणक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने पाण्याची आवक चांगली होत आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात सुमारे ४८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ६४.५५ टीएमसी पाणीसाठा झालेला. २४ तासांत धरणात चार टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला आहे. त्यातच कोयना धरण व्यवस्थापनाने पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू करुन विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी १० वाजता पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन १ हजार ५० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी कोयना नदीत जात आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
Satara: कोयनेतून विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; धरणातील पाणीसाठा ६५ टीएमसीजवळ
By नितीन काळेल | Published: July 23, 2024 12:27 PM