सातारा : माण तालुक्यात डोंगरात वसलेल्या भांडवलीचं खरं भांडवल पाणीच. त्यामुळे भांडवलीतून दुष्काळाच्यावेळी इतर गावांना आणि छावण्यांनाही पाणीपुरवठा व्हायचा. पण, आता हेच भांडवली दुष्काळाचं ‘भांडवल’ झालं आहे. गावाला टॅंकरने पाणीपुरवठा होऊ लागलाय. चाराही विकत घ्यावा लागतोय. भाज्यातून लाखो रुपये मिळविणाऱ्या शेतकऱ्यांवर कांदाही विकत घेण्याची वेळ आली आहे. तसेच खटावमधील टॅंकरमुक्त गारवडीही टंचाईच्या झळा सोसत आहे.माण तालुका दुष्काळी. या तालुक्याच्या उत्तर बाजुला भांडवली गाव. गावाची लोकसंख्या एक हजाराच्यावर. गावचे क्षेत्रफळ ९१७ हेक्टर. त्यामधील बागायत जमीन ५०० हेक्टरवर. या गावाचे वैशिष्ट म्हणजे तिन्ही बाजुंनी डोंगर, खोल दऱ्या. त्यातच गावातून माणगंगा नदी वाहते. त्यामुळे गावाला कधी पाण्यासाठी टॅंकर सुरू करावा लागला नाही. याउलट गावातील विहिरी अधिग्रहण करुन टॅंकरद्वारे पाणी इतर गावांना पुरवले जायचे. पण, उन्हाळ्यात शेतीपाण्याचा प्रश्न निर्माण व्हायचा. विहिरी तळ गाठायच्या. त्यामुळे उन्हाळी पिके जेमतेम व्हायची. हे चित्र बदलण्यासाठी गावाने कंबर कसली आणि वाॅटर कप हे निमित्त झाले.या स्पर्धेत गावाने डोंगराचा पायथा ते माथा, ओढा खोलीकरण, सीसीटी, बंधारे अशी विविध जलसंधारणाची कामे केली. तसेच गावात शेततळी निर्माण करण्यात आली. मातीचे नालाबांध बांधले. या जलसंधारणाचा फायदा दिसून आला. उन्हाळ्यातही पाणी टिकू लागले. पिके घेणेही शक्य झाले. गावात पूर्वी ज्वारी, बाजरी अशी पिके होत. पण, पाण्याची उपलब्धता झाल्याने गावाचे मुख्य पीक कांदा आणि टोमॅटो झाले. १०० एकरवर कांदा, ७०-८० एेकरवर टोमॅटो होऊ लागला. शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळू लागला. पण, आताच्या दुष्काळाने गावकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी पडलं. आता प्यायलाच पाणी नाही. तिथं शेतीचं काय घेऊन बसला, असे ग्रामस्थ सांगू लागले आहेत.भांडवलीत गेल्यावर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. सध्या तीन दिवसांतून गावात पाणी येत आहे. तरीही ते पुरेसे होत नाही. यासाठी गावाला खासगी दोन टॅंकरमधून पाणी पुरवठा हाेतोय. त्यावरच ग्रामस्थ आणि जनावरांचीही तहान अवलंबून आहे. तालुक्यात दुष्काळ पडल्यानंतर भांडवलीतून पाण्याचे टॅंकर भरुन जायचे. त्याच गावाला आता टॅंकरचा आधार घ्यावा लागतोय. गावातील शेतकरी दुग्धोत्पादनही घेत आहेत. पण, दुष्काळामुळे हा व्यवसायही मोडकळीस येऊ पाहतोय. पेंडीचे तसेच चाऱ्याचाही दर वाढलाय. त्यातच दुधालाही दर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे.
कांदा, टोमॅटोतून एक कोटी मिळायचे..भांडवली गावात कांदा आणि टोमॅटो मुख्य पीक आहे. येथील शेतकरी राज्यातील बाजारपेठेत हा शेतमाल पाठवायचे. त्यातून वर्षाला सुमारे एक कोटी रुपये मिळायचे. पण, दुष्काळाने शेतीच पिकली नाही. त्यामुळे कांदा विकत घेण्याची वेळ आलेली आहे. जनावरांसाठीही फलटणच्या कॅनाॅल भागातून चार हजार रुपये टनाने मका आणून जनावरे जगवावी लागत आहेत. गावातून जाणारी माणगंगा नदीही वर्षभरापासून कोरडीच पडलेली आहे. त्यामुळे बंधाऱ्यातही पाणीसाठा झाला नाही.
टॅंकरमुक्त गारवडीत टंचाईच्या झळा..खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील गारवडीच्या आवळे पठारला तालुक्यातील पहिला टॅंकर सुरू व्हायचा. पण, गावाने जलसंधारणाचे काम केल्याने उन्हाळ्यातही विहिरीचं पाणी हाताला यायचं. शेतकरी विविध पिके घ्यायची. तसेच गावाचा टॅंकरही चार वर्षे बंद झाला. पण, गेल्यावर्षी पाऊसच झाला नाही. त्यामुळे गावाला टॅंकरने पाणीपुरवठा होतोय. तीन महिन्यांपासून एका टॅंकरच्या दोन खेपा होतात. हे पाणी कमी पडत असल्याने वाढीव टॅंकरची मागणी करण्यात आलेली आहे. सध्या गावातील योजनेच्या विहिरीत टॅंकरचे पाणी सोडले जात आहे. त्यानंतर गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. कारण, पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. शेतकऱ्यांवर ओला चारा पाण्याच्या भागातून विकत आणण्याची वेळ आली आहे. तसेच गावातील दुग्धोत्पादनही घटले आहे.
जलसंधारणामुळे गाव टॅंकरमुक्त झाले होते. पण, गेल्यावर्षी पाऊस न झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. आता चारा आणि पाणीही विकत घेण्याची वेळ आली आहे. गावातील बोअर आटल्या आहेत. टॅंकरद्वारे पाणी मिळत असलेतरी पुरेसे होत नाही. - संजय शेडगे, ग्रामपंचायत सदस्य गारवडी
माण तालुक्यात दुष्काळ पडला की भांडवली गावातून टॅंकर भरुन जायचे. चारा छावण्याला पाणी देत होते. पण, आताच्या दुष्काळामुळे आमच्यावर टॅंकरचे पाणी प्यायची वेळ आली आहे. तसेच जनावरांना चाराही विकत आणावा लागतोय. कांदा, टोमॅटोतून गावात पैसा यायचा. पण, आता कांदा विकत घ्यावा लागला. दुष्काळाने सर्वच बाजुने दरवाजे बंद केले आहेत. पीक आणि पाणीही नाही. - विजय सूर्यवंशी, भांडवली