पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेकडील सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत मंगळवारी, बुधवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे आणखी अर्ध्या फुटाने वाढ झाली. यामुळे सद्य:स्थितीला तलावात बारा फूट पाणीसाठा शिल्लक आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत असताना पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागली होती. दरम्यान, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कास तलावाचा दुसरा व्हॉल्व्ह बंद करण्यात आला होता. यामुळे सर्वांत शेवटच्या म्हणजेच अंतिम तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे कासचा पाणीपुरवठा सुरू केला होता.
पाणीपातळी हळूहळू खालावत जात अगदी साडेआठ फुटांपर्यंत पाणीसाठा शिल्लक होता. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांत पावसाने जमिनीची धर धरून पाणीसाठा दीड फुटाने वाढून दहा फुट पाणीसाठा झाला होता. तौक्ते चक्रीवादळाच्या पावसामुळे आणखी दीड फूट पाणीसाठा वाढून पाणीपातळी साडेअकरा फुटावर आली. तसेच काल झालेल्या पावसामुळे आणखी अर्धा फूट पाणीसाठा वाढून सध्या कासची पाणीपातळी बारा फूट झाल्याने सातारकरांसाठी समाधानाची बाब आहे.