सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून, गुरुवारी दुपारी कण्हेर धरणातून प्रति सेकंद पाच हजार क्युसेक विसर्ग वेण्णा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. धरणातून सुरू असलेला विसर्ग व जोरदार पावसामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. साताऱ्यातील संगम माहुली येथे कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम झाला असून, या नद्यांची पाणीपातळी वाढल्याने ऐतिहासिक मंदिरांच्या पायऱ्यांना पाणी टेकले आहे. तसेच शाहू महाराज (थोरले) यांची समाधी देखील अर्धी पाण्यात गेली आहे.
विसर्ग अथवा पावसाचा जोर वाढल्यास संगमावर असलेल्या कैलास स्मशानभूमीतील अग्निकुंड पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नदीपात्रात पाणी वाढल्याने संगम माहूली तसेच परिसरातील नागरिकांची पाणी पाहण्यासाठी घाटावर मोठी गर्दी होत आहे.