आॅनलाईन लोकमतमल्हारपेठ (जि. सातारा), दि. १८ : बोडकेवाडी-उरूल, ता. पाटण गावात चार दिवसानंतर एकदा फक्त पंधरा मिनिटे पाणी पुरवठा केला जात आहे. जलयुक्त शिवारमध्ये गाव असूनही पाणी योजना राबविली नसल्यामुळे या गावाला ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला गावास सामोरे जावे लागत आहे.पाटण तालुक्यातील ९ गावे जलयुक्त शिवारसाठी निवडण्यात आली होती. डोंगराच्या पायथ्याशी ९०० लोकसंख्या असणारे बोडकेवाडी गाव अनेक वर्ष पाणी टंचाईशी सामना करत असल्यामुळे जलयुक्त शिवारात या गावाची निवड झाली. जलयुक्तमुळे गावातील १३२ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार होते. २०१६ साली फेब्रुवारीत या गावाची जलयुक्त शिवार योजनेमध्ये निवड झाली. त्यानंतर शासनामार्फत बैठका होवून अधिकाऱ्यांनी गाव टंचाईमुक्त होईल, असे आश्वासन दिले.कृषी विभागाने सुमारे ११ लाख खर्चाचा अहवाल तयार केला. वनविभागाने दोन नवीन बंधारे बांधतो, असे सांगितले. मात्र, आश्वासनाची ती बैठक संपल्यानंतर गावाकडे कोणीच फिरकले नाही. ३५ वषार्पुर्वी १९८० साली बांधलेले ४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व ११ मातीचे बंधारे सध्या गाळाने भरले आहेत.गतवर्षी पावसाळ्यात बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाला. मात्र, पावसाळा संपताच दोन महिन्यात बंधारे कोरडे पडले. सर्व बंधाऱ्यांतील गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत कृषी विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, कृषी विभागाने त्याची दखलच घेतली नाही.
नळाला चार दिवसातून एकदा पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:34 PM