कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीतून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी हा प्रश्न नवीन नाही. मात्र, रविवारी थेट रसायनाचाच लोंढा नजीकच्या ओढ्यात सोडण्यात आला. पहाटेपासून दुपारपर्यंत हे रसायन ओढ्याच्या पाण्यात मिसळत होते. संबंधित ओढा पुढे कृष्णा नदीत मिसळल्यामुळे हे रसायन नदीच्या पाण्यात जाऊन पाणी प्रदूषित होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कऱ्हाडपासून काही अंतरावर पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर तासवडे येथे औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत अनेक कंपन्या आहेत. संबंधित कंपन्यांमधून निघणारा धूर आणि रसायनयुक्त पाणी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. यापूर्वीही याच कारणावरून काहीवेळा वादही निर्माण झाला आहे. मात्र, त्याबाबत अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. रविवारीही येथील रसायन तासवडे आणि बेलवडे हवेली गावाच्या मध्यावर असणाऱ्या ‘पिर’ नावाच्या ओढ्यात मिसळत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. संबंधित ओढ्याला सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे ओढा वाहता आहे. याच पाण्यात पहाटेपासून रसायन मिसळत होते. त्यामुळे पाण्याचा रंग पूर्णपणे लाल झाला.
संबंधित ओढ्यातील पाणी आसपासचे शेतकरी जनावरांसाठी तसेच शेतीसाठीही वापरतात. मात्र, ओढ्यातील पाण्यात रसायन मिसळल्याने आणि पाण्याचा रंग बदलल्यामुळे रविवारी एकाही शेतकऱ्याने जनावरांना ते पाणी दिले नाही. हा ओढा तासवडे आणि बेलवडे हवेली गावच्या शिवारातून पुढे जात कृष्णा नदीत मिसळतो. त्यामुळे रसायनमिश्रीत पाणी नदीपात्रामध्ये जाणार असून, नदीतील पाणीही दूषित होण्याची भीती येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. रविवारी दुपारपर्यंत ओढ्याच्या पाण्यात हे रसायन मिसळत होते. मात्र, एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.