सातारा : कास व शहापूर योजनेतील उपलब्ध पाणीसाठ्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी सातारा पालिकेने दोन्ही योजनांच्या पाणीपुरवठ्यात कपातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी रविवार, दि. १० मार्च पासून केली जाणार आहे. शहरात दोन महिन्यांपासून सुरू असलेला पाणीकपातीचा निर्णय प्रशासनाने रद्द केला असून, आता नवीन वेळापत्रकानुसार प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जाणार आहे.उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच सातारा शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांना कधी कमी दाबाने पाणी मिळत आहे, तर कधी पाणीच मिळत नाही. शहरातील बहुतांश पेठांमध्ये दोन महिन्यांपासून पाण्यासाठी ओरड सुरू आहे. असे असताना प्रशासनाकडून शहराच्या पाणीपुरवठ्यात दर मंगळवार व शनिवारी कपात करण्यात आली. या निर्णयामुळे टंचाईचे ढग अधिकच गडद होत गेले.आता येणारा उन्हाळा सुसह्य जावा म्हणून प्रशासनाने कपातीचा जुना निर्णय रद्द करून प्रत्येक पेठेच्या पाणीपुरवठ्यात आठवड्यातून एक दिवस कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शहापूर योजनेच्या कपातीवर दि. १० तर कास योजनेच्या कपातीवर दि. ११ पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. कास धरणात मुबलक पाणीसाठा असताना हा निर्णय घेण्यात आल्याने प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
साताऱ्यात येत्या रविवारपासून पाणीकपात; जुना निर्णय रद्द, नवीन वेळापत्रक जाणून घ्या
By सचिन काकडे | Published: March 07, 2024 7:19 PM