कोयनानगर : कोयना धरणात ७६.०५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, पूर्वेकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. यामुळे बुधवारी दुपारी १ वाजता धरणाच्या नदी विमोचकातून कोयना नदीपात्रात दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.कोयना धरण पायथा वीजगृहातील दोन्हीही युनिट सुरू आहेत. पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून नदीपात्रामध्ये प्रतिसेकंद २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पूर्वेकडील सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने पायथा वीजगृहातील विसर्ग सुरू ठेवण्याबरोबरच धरणाच्या नदी विमोचकातून नदीपात्रात दीड हजार असा ३६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
नवीन तांत्रिक वर्ष सुरू व्हायला अजून अडीच महिन्यांचा कालावधी बाकी असताना १०५ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या धरणात सध्या ७६.०५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.