पुसेगाव : उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पुसेगाव परिसरात झालेल्या पावसाने चांगलेच झोडपले. खरीपासाठी शेतकऱ्यांना दिलासा तर काही जणांनी वर्धनगड घाटात पाण्याच्या रस्त्यात उभे राहून गडावरून खाली पडणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटला.
वर्धनगड, पवारवाडी, विसापूर, नेर, बुधसह पुसेगाव परिसरास पावसाने झोडपून काढले. खरीप हंगामातील शेतातील कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मात्र आजच्या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीपाच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. वर्धनगडावरून वाहणाऱ्या पाण्याने जणू धबधब्याचेच रूप धारण केले होते. घाटातील रस्ता पूर्ण पाणी भरून वाहत होता. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
पुसेगाव व परिसरात सध्या आले पिकाची लागवड करण्यासाठी शेतीची मशागत करताना या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. यामुळे काही जणांची आले लागण ही पुढे ढकलली जाईल, अशी शक्यता आहे, मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मशागतीला सुरुवात होणार असल्याने कहीं खुशी कहीं गम अशीच अवस्था आजच्या पावसाने केली आहे.