सचिन काकडे ।सातारा : उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सातारा पालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे १० मे ते १० जून या कालावधीत तब्बल ३ कोटी ५८ लाख लिटर पाण्याची बचत झाली आहे. पाण्याची दैनंदिन गरज पाहता पुढील २८ दिवसांच्या पाणीपुरवठ्याची चिंताही आता मिटली आहे.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळा सुरू झाल्यापासून कास तलावाची पाणीपातळी झपाट्याने खालावू लागली आहे. सध्या तलावात केवळ तीन ते चार फूट इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता नगराध्यक्षा माधवी कदम व पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांच्या उपस्थितीत पालिकेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला.
दि. १० मे पासून या निर्णयावर अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार शहरातील प्रत्येक विभागाचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात आला. विशेष म्हणजे, नागरिकांनही पाण्याचे महत्त्व ओळखूून पालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले. दि. १० जून रोजी पाणीकपातीच्या निर्णयाला एक महिना पूर्ण झाला. कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून शहरातील जलकुंभ भरले जातात. या जलकुंभाद्वारे शहराला नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक जलकुंभाची साठवण क्षमता वेगवेगळी आहे. कपातीच्या काळात प्रत्येक टाकीचा पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवण्यात आला. त्यामुळे १० मे ते १० जून या कालावधीत तब्बल ३ कोटी ५८ लाख लिटर पाण्याची बचत झाली आहे.
अशी झाली बचत...कासमधून प्रतिदिन ५ लाख ५० हजार लिटर तर शहापूरच्या माध्यमातून ७ लाख ५० हजार लिटर पाणीपुरवठा केला जातो. म्हणजेच शहराला दररोज १३ लाख लिटर पाण्याची गरज भासते. एका महिन्यात ३ कोटी ५८ लाख लिटर पाण्याची बचत झाल्याने पाऊस जरी लांबणीवर गेला तरी शहराला पुढील २८ दिवस पाणीपुरवठा होऊ शकतो.
टाकीचे नाव झालेली पाणीबचत(१० मे ते १० जून)बुधवार नाका टाकी, पॉवर हाऊस ६० लाख लिटरयशवंत टाकी (पहिला झोन) खापरी लाईन ४२ लाख लिटरयशवंत टाकी (दुसरा झोन) पावर हाऊस मेन लाईन ४४ लाख लिटरभैरोबा टाकी, राजवाडा टाकी, पंपिंग लाईन ४८ लाख लिटरव्यंकटपुरा टाकी, घोरपडे टाकी (सकाळ सत्र) ४० लाख लिटरकोटेश्वर टाकी, घोरपडे टाकी (दुपार सत्र) ५६ लाख लिटरकात्रेवाडा टाकी, गणेश टाकी, गुरुवार टाकी ६८ लाख लिटरएकूण बचत ३ कोटी ५८ लाख लिटर
खा. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सूचनेनुसार शहरात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत झाली. टंचाई काळात सहकार्य केल्याने नागरिकांचेही कौतुक करायला हवे. कास व उरमोडी धरणात समाधानकारक साठा होईपर्यंत पाणीकपात सुरू राहणार आहे.- श्रीकांत आंबेकर,पाणीपुरवठा सभापती