सातारा : जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाढत असून सध्या ११९ गावे आणि ३८८ वाड्यांना झळ पोहोचली आहे. यासाठी ११२ टॅंकर सुरू असून त्यावर २ लाख ११ हजार नागरिकांची तहान अवलंबून आहे. तरीही टॅंकरचे पाणी पुरत नसल्याने लोकांच्या पाण्यासाठी वाटा फुटल्या आहेत. मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे. तर एप्रिल आणि मे महिना आणखी तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यात दरवर्षीच उन्हाळ्यात टंचाई स्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. पण, गेल्यावर्षी जिल्ह्यातच अपुरे पर्जन्यमान झाले. त्यामुळे यावर्षी टंचाईची स्थिती वाढली आहे. त्यातच गेल्यावर्षी मार्च-एप्रिल महिन्यात अनेक गावांत टॅंकर सुरू झाले होते. अशा अनेक गावांत एक वर्षापासूनचा टॅंकरचा फेरा सुटलेला नाही. तर सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने टॅंकरला मागणी वाढली आहे. गावागावांतून प्रस्ताव दाखल होत आहेत. त्यानंतर प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येतात.
माण तालुक्यात सर्वाधिक दाहकता
माण तालुक्यात दाहकता सर्वाधिक आहे. ५१ गावे आणि २९९ वाड्यांसाठी ५४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खटाव तालुक्यातही टंचाई वाढत असून सध्या २३ गावे आणि ९ वाड्यांना झळ पोहोचलीय. यासाठी २१ टॅंकर सुरू असून ४९ हजार नागरिक आणि सुमारे पाच हजार पशुधन टॅंकरवर अवलंबून आहे. मांजरवाडी, नवलेवाडी, मांडवे, नागाचे कुमठे, गोसाव्याचीवाडी, धारपुडी आदी ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर फलटण तालुक्यातही २० गावे आणि ७५ वाड्यांसाठी १४ टॅंकर सुरू आहेत. कोरेगाव तालुक्यातील २२ गावे टंचाईत आहेत. खंडाळा तालुक्यातही एका गावासाठी टॅंकर सुरू झाला आहे. वाई तालुक्यात २ गावे आणि ३ वाड्यांसाठी २ टॅंकर सुरू आहेत. पाटण तालुक्यातील दोन वाड्यांसाठी पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
सवा लाख पशुधन बाधित; १०३ खासगी टॅंकर सुरू..जिल्ह्यात सध्या १ लाख २२ हजार ६३२ जनावरांना टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे. तर सध्या ११२ टॅंकर सुरू आहेत. या टॅंकरबरोबरच खासगी विहिरी आणि बोअरवेलचेही अधिग्रहण करण्यात आलेले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात पाणी मिळविण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत.