पळशी : कायम दुष्काळी म्हणून शिक्का बसलेल्या माण तालुक्यातील मार्डी येथे रविवारी सकाळी पाणीटंचाईचा बळी गेला. टॅँकर बंद झाल्याने शिपदरा परिसरातील विहिरीत पाणी आणण्यासाठी गेले असता पाय घसरून विहिरीत पडल्याने बाळू बबन सावंत (वय ३५) यांचा मृत्यू झाला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिपदरा येथील बाळू सावंत हे शेजारच्या विहिरीवरून पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले; मात्र त्यांना येण्यास उशीर झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. संशय आल्याने कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने या विहिरीत शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर तेथे सावंत आढळले. त्यांना विहिरीतून बाहेर काढून दहिवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मार्डीमध्ये डिसेंबरमध्येही तीन टँकरमधून पाणीपुरवठा केला जात होता. त्यातील दोन बंद केल्याने केवळ एकाच टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी खोल विहिरीत उतरावे लागत आहे. यातूनच बाळू सावंत यांचा ‘पाणीटंचाई बळी’ गेल्याचा आरोप कुटुंबीय व ग्रामस्थांनी केला आहे. (वार्ताहर)
माण तालुक्यात ‘पाणीटंचाई’चा बळी!
By admin | Published: December 13, 2015 10:55 PM