बामणोली : बामणोली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साईनगर, म्हावशी व सावरी गावांना डोंगरातील झऱ्यांचे गुरुत्वाकर्षण पध्दतीने पाणीपुरवठा होत आहे. परंतु सध्या या झऱ्यांचे पाणी खूपच कमी झाले आहे. यावर उपाय म्हणून बामणोलीच्या नूतन सरपंच जयश्री गोरे यांनी म्हावशी गावामध्ये ओढयालगत असणारा आड नावाचा पाणवठा उकरण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्यात दगड, गोठे, गाळ येऊन बसला होता. सरपंचांनी महिला व युवकांना प्रेरित करून गाळ काढण्याचे ठरविले. स्वतः पाच तास श्रमदान केले. यातून तीन ट्रॉली गाळ काढला.उन्हाळा सुरू झाल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्याचा पश्चिम भाग हा सह्याद्री पर्वतरांगांच्या तीव्र उतार व डोंगरदऱ्या खोऱ्यांनी वेढलेला आहे. पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडूनही पाणी वाहून जाते. तीव्र उतारामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. उन्हाळ्यात बामणोली, तापोळा, कास परिसरातील अनेक गावे, वाड्या, वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तो स्वच्छ केल्याने हा पाणवठा गावाबाहेर जंगला जवळ असल्याने जंगलातील ससे, हरणे, मोर, डुक्कर व अनेक पक्षी यांना उन्हाळभर पिण्यासाठी उपयोग होणार आहे.
म्हावशी गावात उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर उपाय म्हणून मी महिला व तरुणांना माहिती देऊन गावच्या जुन्या पाणवठ्यातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. स्वतः त्यांच्याबरोबर श्रमदान करून तीन ट्रॉली गाळ काढला. या श्रमदानासाठी मी ग्रामपंचायतीचा कोणताही निधी खर्च केला नाही.- जयश्री गोरे,सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत बामणोली कसबे ता. जावली.
गावच्या सरपंचांनी आम्हाला पाणवठ्यातील गाळ काढण्याचे आवाहन केले. आम्ही दहा, बारा जणांनी सुमारे पाच तास श्रमदान करून पाणवठा स्वच्छ केला. तेथे स्वच्छ पाणी साठले आहे. या पाण्याचा माणसांबरोबर जनावरे तसेच वन्यप्राणी व पक्ष्यांनाही पिण्यासाठी होणार आहे.- अंकुश उतेकर,ग्रामस्थ म्हावशी ता. जावळी.