आॅनलाईन लोकमतआदर्की (जि. सातारा), दि. २२ : फलटण तालुक्यातील हिंगणगाव व मुळीकवाडी धरणातील पाणीसाठा संपत आल्याने मुळीकवाडी, घाडगेवाडी, सासवड, आदर्की बुद्रुक, हिंगणगाव, परहर या सहा गावांवर पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
१९९९ मध्ये सासवड प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आली. परंतु कामाचा दर्जा चांगला नसल्याने ही योजना अल्पावधीतच बंद पडली. त्यामुळे मुळीकवाडी, घाडगेवाडी या गावांनी मुळीकवाडी धरणात विहीर खोदून पाणीपुरवठा सुरू केला.
सासवड ग्रामपंचायतीने देखील धरणातून पाईपलाईनद्वारे धरणाचे पाणी सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत सोडले. मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याचा वापर फक्त इतर कामांसाठीच होऊ लागला. आता मुळीकवाडी धरणातही अल्प पाणीसाठा राहिल्याने ऐन पावसात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हिंगणगाव धरणात पाणीसाठा संपत आल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या हिंगणगाव, आदर्की बुद्रुक येथील पाणी योजनांवर संकट निर्माण झाले आहे.