सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असल्याने प्रमुख धरणांत कमी प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत कोयनेला २, महाबळेश्वर ४ आणि नावजला ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणातील पाणीसाठा १०४.१७ टीएमसी झाला होता.जिल्ह्याच्या अनेक भागात मागील रविवारी दमदार पाऊस झाला होता. यामध्ये ऊस, बाजरी, सोयाबीनसह भुईमुगाचे अधिक नुकसान झाले. यामुळे शेतकरी कोलमडला. त्यानंतर मात्र, पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.
पश्चिम भागात तुरळक स्वरूपात पाऊस होत आहे. तर पूर्व भागात गेल्या काही दिवसांत पाऊस झाला नाही. सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत कोयनेला अवघा २ मिलिमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ४२३९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
महाबळेश्वरला ४ आणि यावर्षी आतापर्यंत ४८५१ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तर नवजा येथे जूनपासून ४८५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०४.१७ टीएमसी पाणीसाठा झाला होता.
धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून कोयना धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. दरम्यान, साताऱ्यात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर सोमवारी ढगाळ वातावरनाबरोबरच दुपारी सूर्यदर्शन झाले.