सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम असून पश्चिमेकडे उघडझाप सुरू आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. परिणामी कोयनेतील धरणसाठा अजून ८३ टीएमसी खालीच आहे. तर गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला १९ मिलीमीटर झाला आहे.पावसाळ्याचे दोन महिने होऊ गेले आहेत. आतापर्यंत काही भागात चांगला पाऊस झाला. तर कोठे अजुनही प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर आतापर्यंत पूर्व भागातील माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यात कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीवरही परिणाम झाला. तर पश्चिमेकडे गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस पडला. पण, अजुनही धरणे भरलेली नाहीत. त्यातच सध्या काही भागात पावसाची उघडीप आहे. तर कोठे अत्यल्प स्वरुपात पाऊस हजेरी लावत आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १५ तर नवजाला १४ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३१४८ आणि महाबळेश्वर येथे ४१६९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक पावसाची नोंद ही नवजा येथे ४४७९ मिलीमीटर इतकी झालेली आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा भागात पावसाची उघडझाप सुरू आहे.पश्चिम भागातच मोठे पाणी प्रकल्प आहेत. या प्रकल्पातील पाणीसाठ्यात मागील आठवड्यात मोठी वाढ झालेली नाही. कारण, तुरळक स्वरुपात पाऊस होत असल्याने धरणातील आवक कमी झालेली आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात २७६१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणपाणीसाठा ८२.८३ टीएमसी झाला होता. दोन दिवसांपासून धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.
कोयनेतील पाणीसाठा ८३ टीएमसी खालीच, सातारा जिल्ह्याच्या पूर्वकडे पावसाची प्रतीक्षा कायम
By नितीन काळेल | Published: August 10, 2023 12:44 PM