सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस असल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहत होती. त्यानंतरही अवकाळी पाऊस झाल्याने सिंचनासाठी अजूनही पाण्याची मागणी कमी आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरही प्रमुख सहा धरणांत तब्बल ११२ टीएमसी पाणीसाठा आहे. मात्र, उन्हाळ्यात सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढणार आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणातून पिण्यासाठी आणि सिंचनासाठीही तरतूद केलेली आहे. मागणीप्रमाणे पाणी विसर्ग होतो. या सर्व प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७६ टीएमसी इतकी आहे. मागील चार वर्षांत जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच धरणे तुडुंब भरतात. त्यातच ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडत आहे. अनेक वेळा नोव्हेंबर महिन्यातही अवकाळी पावसाचा फटका बसतो. त्यामुळे याचा परिणाम हा रब्बी पेरणी तसेच सिंचनाच्या पाणी मागणीवरही झालेला आहे.जिल्ह्यातील धरणातून अनेक तालुक्यातील सिंचनासाठी पाणी साेडले जाते. तसेच येथील धरणातील पाणी हे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही आरक्षित आहे. त्यामुळे मागणीप्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. पण, यंदा अजूनही सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात मागणी नाही. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात उन्हाळा आहे. त्यावेळी सिंचनाला पाणी मागणी वाढू शकते.
सध्या धोम, उरमोडीतून सिंचनासाठी विसर्ग...सध्या कोयना धरणातून पायथा वीजगृहासाठी २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धोम धरणाच्या उजव्या कालव्यातून ५१६ क्यूसेक पाणी सिंचनासाठी सोडले जात आहे. तर उरमोडीतून डाव्या कालव्याद्वारे ४५० आणि नदीमार्गे २०० क्यूसेक पाणी सिंचनासाठीच सोडले जात आहे. तर कण्हेर धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी साेडले जात होते. हे पाणी १३ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहे.उरमोडीच्या पाण्याचा कमी वापर...सातारा तालुक्यात ९.९६ टीएमसी क्षमतेचे उरमोडी धरण आहे. या धरणातील पाणी सातारा, माण आणि खटाव तालुक्यातील सिंचनासाठी आरक्षित आहे. पण, या धरणावरील सिंचन योजनेची कामे सुरूच आहेत. त्यामुळे धरणातील सिंचनासाठी तरतूद केलेल्या सर्व पाण्याचा वापरच होत नाही. पाणी धरणामध्येच राहते.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे - गतवर्षी - यावर्षी - यंदाची टक्केवारी - एकूण क्षमता
- धोम - ८.०६ - १०.११ - ७४.९२ - १३.५०
- कण्हेर - ७.१५ - ६.५३ - ६४.६३ - १०.१०
- कोयना - ८०.९८ - ७६.०८ - ७२.२८ - १०५.२५
- बलकवडी - ३.४१ - ६.५३ - ८३.५० - ४.०८
- उरमोडी - ९.१४ - ७.७९ - ७८.१९ - ९.९६
- तारळी - ४.५० - ४.६८ - ७९.९८ - ५.८५