सातारा : पावसाळा अर्धा संपत आला तरीही जिल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे आजही १७४ गावे आणि ९३९ वाड्यांतील सव्वा तीन लाखांवर नागरिकांना २०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाला नाही तर टँकरग्रस्तांची संख्या आणखी वाढू शकते. सध्यस्थितीत माण तालुक्यात टंचाईची स्थिती अधिक आहे.सध्या पावसाळा ऋतु सुरू आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपत आले आहेत. या काळात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्यामुळे टँकर व टंचाईग्रस्तांची संख्याही कमी झाली. तर पश्चिम भागातील सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण तालुक्यात पाऊस झाल्याने टँकर बंद झाले आहेत.
मात्र, पूर्व भागातही अद्यापही म्हणावसा पाऊसच झालेला नाही. त्यामुळे काही भागात पाऊस झाला तेथील टँकर बंद झाले असलेतरी उर्वरित ठिकाणी सुरूच आहेत. माण तालुक्यात दाहकता मोठी असून खटाव, फलटणमधील अनेक गावेही टँकरवरच अवलंबून आहेत.