पाटण : सध्या तीव्र पाणीटंचाई आणि भीषण दुष्काळाची स्थिती राज्यासमोर उभी असल्यामुळे कोयना धरणातून सतत पाणी सोडणे सुरू आहे. एकीकडे सांगलीकडे सिंचन आणि पिण्यासाठी पाणी पुरविण्यास प्राधान्य दिले जात आहे. तर दुसरीकडे वीजनिर्मितीसाठी कोयनेतून दिला जाणारा पाणीकोटा वेगाने वापरला जात आहे. त्यामुळे आता धरणात केवळ २२.३९ टीएमसी पाणी शिल्लक आहे.
अशीच स्थिती राहिली तर जूनमध्ये मोठे पाणीबाणीचे संकट उभे राहणार असून, मे अखेर कोयनेतील पाण्यावर तयार होणारी वीजनिर्मितीची जनित्रे बंद पडणार आहेत.१०५.२५ टीएमसी पाणीसाठा क्षमतेच्या कोयना प्रकल्पातून ६७.५० टीएमसी पाणी वर्षभरात विजनिर्मितीसाठी वापरले जाते. तर गरजेनुसार ३० टीएमसी इतका पाणीसाठा पूर्वेकडील सिंचनासाठी दिला जातो. तर ५.१२ टीएमसी पाणीसाठा हा धरणातील गाळात समाविष्ट असल्यामुळे त्याचा मृतपाणीसाठा म्हणून उल्लेख केला जातो.
मार्चपासून राज्यभर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोयना धरणातून प्रथम नदी विमांचकाद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. आजअखेर नदी विमांचकाद्वारे ३.९० टीएमसी पाणी वीजनिर्मिती न करता सांगलीकडे द्यावे लागले आहे.
पुणे वेधशाळेकडून कोयना सिंचन मंडळाकडे पावसाचा अंदाज प्र्राप्त होेतो. त्यानुसार सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल झाला असून, तो केरळमध्ये येण्यास आठ जूनपर्यंतचा कालावधी आहे. त्यानंतर महाराष्ट्रात मान्सून हजेरी पंधरा दिवसानंतर लागेल. म्हणजेच जून महिना हा संपूर्ण कोरा जाईल आणि असे घडल्यास कोयना धरणातील ५ टीएमसी हा मृत पाणीसाठा केवळ सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरावा लागेल. म्हणजेच कोयना धरणात पाण्याचा खडखडाट होऊन पाण्यासाठी आणीबाणी निर्माण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.