सातारा : सातारा - कास रस्त्याचे रुंदीकरण सुरू असून, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये प्राथमिक शाळा पेट्री बंगला व आदर्श माध्यमिक विद्यालय, पेटेश्वरनगर (पेट्री) या शाळांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तुटल्यामुळे या दोन्ही शाळांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. तो आजअखेर बंदच असल्याने तत्काळ दुरूस्ती करून पाईपलाईन जोडण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
पेटेश्वरनगर (पो. पेट्री, ता. सातारा) येथील माध्यमिक विद्यालयात आसपासच्या गावातून साधारण दहा त बारा किलोमीटर परिसरातील बरेच विद्यार्थी दहावीत शिक्षण घेत आहेत. दरम्यान, शाळेच्या पाईपलाईन दुरुस्तीअभावी या विद्यार्थ्यांना घरून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे.
शाळेच्या पाईपलाईनची दुरुस्ती व्हावी, यासाठी रस्त्याच्या रुंदीकरणाचे ठेकेदार यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता, पाईपलाईन टाकून देतो, असे गेले वर्षभर सांगत आहेत. या भागातील लोकप्रतिनिधींनी संबंधित ठेकेदाराला फोन केला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शाळेने पत्रव्यवहार केला असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांनी दुरुस्तीच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांचे २७ जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान साधारण एक महिनाभर पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल झाले होते. सध्या दहावीचे वर्ग सुरु आहेत. दहावीची परीक्षा तोंडावर आली असून, या कडाक्याच्या उन्हात पिण्याचे पाणी उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती पिसाणीचे सरपंच लक्ष्मण गोगावले यांनी दिली.
(कोट)
सध्या दहावीचे वर्ग सुरू आहेत. दहावीची परीक्षा जवळ आली असून, मुलांना घरून पाणी आणावे लागत आहे. हे योग्य नसून संबंधित ठेकेदार स्थानिक लोकांचे मत अजिबात विचारात घेत नाही. पाईपलाईनची तत्काळ दुरुस्ती करून शाळेचा पाणीपुरवठा सुरळीत करावा.
- सोमनाथ जाधव, अध्यक्ष, पठार विभाग भूमिपुत्र संघटना