लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहापूर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी वितरण होणाऱ्या जलवाहिनीला बोगदा परिसरात गळती लागली आहे. ही गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे या योजनेतून गुरुवार टाकी, गणेश टाकी, यशवंत टाकीसह परिसरातील नागरिकांना मंगळवार, दिनांक १ जून रोजी सकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. बुधवार, दिनांक २ जून रोजी पाणीपुरवठा कमी - जास्त प्रमाणात होईल, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहरातील शहापूर पाणीपुरवठा योजनेच्या ४५० एमएम व्यासाच्या वितरण नलिकेला मोठ्या प्रमाणावर बोगदा येथील चौगुले घरासमोर गळती लागली आहे. ही गळती काढण्याचे काम नगरपालिकेने रविवारी युद्धपातळीवर हाती घेतले आहे. काम अवघड असल्याने त्याचा परिणाम म्हणून पाणी उपसा केंद्र बंद ठेवावे लागले आहे. शहरातील पाण्याच्या वितरण टाक्यांना पुरेसे पाणी मिळणार नाही. त्यामुळे मंगळवार, दिनांक १ जून रोजी सकाळच्या सत्रात शहापूर उद्भभव योजनेतून गुरुवार टाकी, गणेश टाकी, यशवंत टाकी, घोरपडे टाकी, राजवाडा टाकी, बुधवार नाका टाकी याद्वारे पाणी वितरित होणाऱ्या भागाचा सकाळच्या सत्रातील पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
दरम्यान, बुधवार, दिनांक २ रोजी पाणीपुरवठा कमी - जास्त प्रमाणात होईल. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.