म्हसवड : ‘जलयुक्त शिवार अभियानामध्ये प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून सहभागी व्हावे. लोकसहभागातूनच हे अभियान यशस्वी होणार असून, या अभियानाच्या संधीतून जनतेने आपल्या गावात अधिकाधिक जलसंधारणाची कामे हाती घेऊन संपूर्ण तालुका टंचाईमुक्त करण्यासाठी सज्ज व्हावे,’ असे आवाहन माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.राज्य शासनाच्या वतीने ‘सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त राज्य’ करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक, पिंगळी खुर्द, पळशी, परकंदी, कुळकजाई, तोंडले, मोगराळे, इंजबाव, संभूखेड व पर्यंती या गावातील विविध कामांचा प्रारंभ आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार महेश पाटील, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर, उपसभापती अतुल जाधव, पंचायत समिती सदस्य दादासाहेब हुलगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला म्हणाले, ‘दुष्काळी माण व खटाव तालुका अशी ओळख असणाऱ्या दोन्ही तालुक्यांना लागलेला दुष्काळी कलंक पुसण्यासाठी व या भागात जलक्रांती व हरितक्रांती करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, प्रशासन व जनता या दोघांचा मिलाप होऊन जलयुक्त शिवार अभियान गतीने व यशस्वी होईल. लोकसहभागाशिवाय कामे गतीने होणार नाहीत, तरी विविध सामाजिक संघटना व इतर संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पिंगळी बुद्रुक, पिंगळी खुर्द, पळशी, परकंदी, कुळकजाई, तोंडले, मोगराळे, इंजबाव, संभूखेड, पर्यंती गावातील शेतकरी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार यशस्वी करू : गोरे
By admin | Published: January 30, 2015 10:24 PM