सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळामुळे सुरू झालेले टँकर वर्षभरानंतर बंद झाले. गुरूवारी माण तालुक्यात टँकरची शेवटची फेरी झाली. तर यावर्षी मे महिन्यात २१८ गावे ७१६ वाड्यावस्त्यांसाठी २०८ टँकरचा धुरळ उडत होता.जिल्ह्यात गेल्यावर्षी वार्षिक सरासरीच्या अवघे ६५ टक्केच पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे पूर्व दुष्काळी भागातील तलाव, विहिरी ही कोरड्या होत्या. तर पश्चिम भाग पावसाचा असूनही कोयनासह प्रमुख मोठे पाणी प्रकल्पही भरले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातच दुष्काळी स्थिती निर्माण झालेली. परिणामी ऑक्टोबर महिन्यापासून दुष्काळी उपाययोजना सुरू होत्या. त्याचवेळी पूर्व भागातील तालुक्यातून पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी झाली होती. त्यानुसार टप्प्याटप्प्याने टँकर सुरू झाले.नोव्हेंबर महिन्यापासून टँकरला सुरूवात झाली. त्यानंतर उन्हाळा सुरू झाल्यानंतर टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत गेली. हळूहळू जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात टँकर सुरू झाले. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यात टंचाईने उग्र स्वरुप गाठले. यामध्ये ७५ टक्के माण तालुका टंचाईच्या फेऱ्यात होता. तसेच खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यातही टँकरग्रस्त गावांची संख्या वाढत गेली. मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील २१८ गावे आणि ७१६ वाड्यांना टँकर सुरू होते. यामध्ये माण तालुक्यात ७१ गावे आणि ४४५ वाड्या तहानलेल्या होत्या. माणमधील १ लाख २६ हजार नागरिक आणि १ लाख ३७ हजारांवर पशुधनाला टॅंकरच्याच पाण्याचा आधार होता. खटाव तालुक्यातही ५५ गावे आणि १४५ वाड्यांसाठी ४१ टॅंकरे पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर ८४ हजार नागरिक आणि ४५ हजार जनावरांची तहान अवलंबून होती. फलटण तालुक्यातही ४२ गावे ११३ वाड्या, कोरेगाव तालुक्यात ३३ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसेच खंडाळा, वाई, कऱ्हाड या तालुक्यातही टॅंकर सुरू होता. त्यामुळे मे महिन्यात ३ लाख ३२ हजार नागरिक आणि अडीच लाखांवर पशुधनाला टॅंकरच्याच पाण्याचा आधार होता.
आनंदवार्ता!, सातारा जिल्ह्यातील पाणी टंचाई संपली; शेवटची फेरी मारून टँकर परतला
By नितीन काळेल | Published: October 18, 2024 7:22 PM