सातारा : जिहे-कठापूर योजनेसाठी धरणातून पाणी चोरी होत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागासमोर ठिय्या मांडल्यावर अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बुधवारी बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई असल्याने पिण्यासाठी पाणी सोडले आहे. तुमच्या हिश्शाचे पाणी धरणातच असल्याचे स्पष्ट केले. मात्र, यावर शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे दोन दिवसांत पुढील भूमिका ठरवू, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.याबाबत माहिती अशी की, जिहे-कठापूर योजना चारमाही असून पावसाळ्यात पाणी उचलण्याची परवानगी आहे. तरीही सध्या बेकायदेशीररित्या पाणी उपसा सुरू आहे. तर कण्हेर, धोम, उरमोडी धरण लाभक्षेत्रात दुष्काळ असतानाही पाणी चोरले जात आहे ते थांबवावे, अशी मागणी करत सातारा, काेरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास पाटबंधारे विभागात धडक मारुन आक्रमक पवित्रा घेतला. तेव्हा पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी बोलणी सुरू केली.पण, शेतकरी पाणी थांबविल्याशिवाय माघार घेणार नाही या मागणीवर ठाम होते. तसेच टंचाई असताना कण्हेर, उरमोडी, धोम धरणातून आमच्या हक्काच्या पाण्याची चोरी होत आहे हेही थांबवा, असाही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला. यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरच पाटबंधारे कार्यालयासमोरील आंदोलन स्थगित करण्यात आले होते.या आश्वासनानंतर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याबरोबर शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, ज्येष्ठ नेते यशवंत ढाणे, बाबासाहेब घोरपडे, धोम संघर्ष समितीचे रणजित फाळके, नंदकुमार पाटील, बर्गे सर, हणमंत शेडगे, तुकाराम शेडगे, धनाजी घाडगे, भरत देशमुख, नितीन काळंगे, दीपक पवार, लालासो पवार, जगन्नाथ जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्व भागात टंचाई आहे. त्यामुळे धरणातून पिण्यासाठी पाणी सोडले आहे. तुमच्या हिश्शाचे पाणी धरणातच आहे. पिण्याच्या पाण्यासाठी अडवणूक करता येत नाही असे स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी वेण्णा, कृष्णा नदीकाठच्या शेतीपंपाच्या वीजजोडण्या पूर्ववत करण्याचे आदेश दिले, अशी माहितीही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आली.
जिहे-कठापूर पाणी योजना बेकायदेशीरपणे सुरू आहे. नियमाचा भंग करुन पाणी नेले आहे. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. यावेळी त्यांनी पिण्यासाठी पाणी सोडल्याचे सांगितले. यामुळे आमचे समाधान झालेले नाही. दोन दिवसांत पुढील भूमिका ठरविणार आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना