कऱ्हाड : यंदा उन्हाळ््याच्या झळा खूपच जाणवू लागल्या आहेत. त्याला कऱ्हाड तालुकाही अपवाद नाही. तालुक्यातील ५९ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. नजीकच्या काळात आणखी टंचाई वाढू शकते. या कारणाने प्रशासन हतबल असताना सवादेत मात्र सार्वजनिक विहिरीतून वैयक्तिक शेतीस पाणीउपसा सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. विशेष म्हणजे हा प्रताप विद्यमान उपसरपंच करीत असल्याने कुंपणच शेत खात असल्याची भावना ग्रामस्थांनी निवेदनातून व्यक्त केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यमान उपसरपंच संजय बाबूराव शेवाळे यांनी पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीमधून स्वत:च्या क्षेत्रातील ऊस पिकासाठी पाणीउपसा पंधरा दिवसांपासून सुरू केला आहे. यासाठी उपसरपंच शेवाळे हे गावविहिरीपासून २0 फूट अंतरावर असणाऱ्या अंतू नाना शेवाळे यांच्या मालकीच्या पाईपलाईनचा वापर करीत आहेत. दरम्यान, २३ मार्च रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सदस्या रंजना उत्तम थोरात यांनी उपसरपंच संजय शेवाळे यांना पाणीटंचाई भासत असताना तुम्ही कोणत्या अधिकाराने गावविहिरीचे पाणी शेतीसाठी वापरत आहात, अशी विचारणा केली. मात्र, उपसरपंच शेवाळे यांनी ‘मी १0 वर्षे ग्रामपंचायतीमध्ये कारभार करीत असून, तुम्ही मला काही शिकवू नका, कोणाकडे तक्रार करायची ती करा,’ असे उत्तर दिल्याचे रंजना थोरात यांनी म्हटले आहे. गावाला पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असताना दुष्काळाच्या झळांमुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना एका बाजूला शासन परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या विहिरींचे अधिग्रहन करत आहे. याउलट सवादेचे उपसरपंच मात्र खुद्द गावविहिरीच्या पाण्याचा वापर गैरमार्गाने शेतीसाठी करत आहेत, ही बाब गंभीर आहे. याबाबत योग्य ती दखल त्वरित घ्यावी, अन्यथा उपोषण, मोर्चा किंवा इतर मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर रंजना उत्तम थोरात, बाबूराव थोरात, नितीन थोरात, विलास थोरात, बाबासाहेब थोरात, सुनील थोरात, रंगराव सुतार, दिगंबर चव्हाण, रघुनाथ पाटील, शंकर गुरव आदी वीस जणांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
गावाचं पाणी कारभाऱ्याच्या शेताला!
By admin | Published: March 27, 2016 12:15 AM