पाटण : राज्यातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प म्हणून कोयना धरणाकडे पाहिले जाते. याच कोयना धरणातील पाणीसाठ्यावर गेली ५० वर्षे महाराष्ट्र व इतर राज्याची तहान भागविली जाते. त्याच बरोबर भरवशाचे पॉवर स्टेशन म्हणूनही कोयनाने अखंडित ऊर्जा पुरविली आहे. त्याच कोयना धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती नाजूक असून, धरणात आजमितीस ५९.२२ टक्के म्हणजेच ६२.३३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.हा पाणीसाठा आगामी पाच महिन्यांसाठी विजनिर्मिती आणि पूर्वेकडील सिंचन, पिण्याचे पाणी यासाठी पुरणार कसा याची चिंता लागून राहिली आहे. दरम्यान, कोयनेतील पाणीसाठ्याचे नवे नियोजन बारगळले आहे. आजपर्यंत जुन्याच नियोजन पद्धतीवर धरणातील पाणीवापर सुरू असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नव्या पाणीवाटप नियोजनाचे आदेश मंत्रालयातून देण्याचे विसरले की काय अशी टिप्पणी जनतेतून व्यक्त होत आहे. कोयना धरणाची पाणीक्षमता १०५.२५ टीएमसी असून त्यापैकी जून ते मे अशा वार्षिक करारानुसार ६७.५० टीएमसी पाणी विजनिर्मितीला वापरायचे तर २२ ते ३० टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी वापरावयाचा असा करार आहे. या वर्षातील धरणाची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. यावर्षी फक्त ८० टीएमसी पाणीसाठा झाला. धरण पूर्णक्षमतेने भरले नाही. त्यापैकी १ जूनपासून विजनिर्मितीसाठी २८.७७ टीएमसी पाणी वापरले गेले. तर पूर्वेकडील सांगलीसाठी १३.७४ टीएमसी पाणी आजअखेर विजानिर्मिती करून पायथा विजगृहातून सोडले गेले. आता प्रश्न उरतो तो आगामी पाच महिन्यांसाठीचा. विजनिर्मितीसाठी आणि सिंचन, पिण्याचे पाणी यासाठी धरणातील पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. दुष्काळ, उन्हाळ्याची तीव्रता यांचा सामना कसा करायचा. मग ५० टक्के पाणीसाठा काटेकोरपणे वापरावा लागेल. याचे नियोजन जलसंपदा विभागाला नाही, त्यामुळेच आजअखेर नवीन पाणी नियोजन लागू करण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी) पायथा विजगृहातून सतत पाणी वापर सांगली पाटबंधारे विभागाने आपली पाणी मागणी सतत सुरू ठेवल्याने कोयना धरणाच्या पायथा विजगृहातून सतत पाणी सोडणे सुरू आहे. पश्चिमेकडील पहिला, दुसरा आणि चौथा टप्पा यासाठी दिवसाकाठी ०.१८ टीएमसी पाणीवापर होत आहे. अद्याप तरी पाणी टंचाईच्या झळा जाणवत नसल्यामुळे कोयनेचे गांभीर्य वाटत नसावे. कोयना धरणातील अपुरा वाटणारा पाणीसाठा याबाबत कोयना धरण व्यवस्थापन गंभीर आहे. मात्र सांगली पाटबंधारे आणि जलसंपदा विभाग यांच्या आदेशाशी आम्ही बांधील आहोत. त्यांनी ठरविल्या नुसारच आम्हाला काम करावे लागते. - ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन
आगामी पाच महिने पाणीबाणी!
By admin | Published: December 30, 2015 10:54 PM