‘शिक्षण, आरोग्य आणि पाणी या विषयांना माझे प्राधान्य राहणार आहे. तसेच मतदारसंघातील टँकर बंद करून शेतीला शाश्वत पाणी मिळण्यासाठी वॉटरग्रीन प्रोजेक्ट राबविणार आहे. त्यामुळे पाणीदार गावे करण्यासाठी माझे प्राधान्य राहील,’ असे आत्मविश्वासपूर्ण सांगत होते माण मतदारसंघातील ‘आमचं ठरलंय’मधील अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांवर आपले रोखठोक मतही व्यक्त केले.नवनाथ जगदाळे ।’ प्रश्न : निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा कोणता ?उत्तर - माझे पहिले प्राधान्य शिक्षणाला आहे. मी स्वत: जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलोय. मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. माण आणि खटावमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. तसेच चांगले महाविद्यालय किंवा अद्ययावत असे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणार आहे. त्याठिकाणी कष्ट घेण्याची तयारी असणारे विद्यार्थी शोधून ठेवण्यात येतील. यामधून प्रत्येक गावात अधिकारी झाला पाहिजे, ही माझी भूमिका राहील.
’ प्रश्न : गेल्या पाच वर्षांत कोणती कामे झाली नाहीत ?उत्तर - ललिता बाबर, किरण भगतसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू या मातीने दिले. माण-खटावसारख्या ठिकाणची क्रीडा संकुले अपूर्ण आहेत ते होणे गरजेचे आहे. तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होणे गरजेचे होते. मात्र, कोणताही उद्योग उभा राहिलेला नाही. तालुक्यात चांगले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नाही. ते होणे गरजेचे होते. आजही अनेकांना फलटण, अकलूज भागात जावे लागते. अनेकांना वेळेत उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. चांगल्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आजही अनेक मुलांना बाहेर शिक्षणाला जावे लागते.
’ प्रश्न : तुम्ही कोणत्या कामाला प्राधान्य देणार ?उत्तर - माण-खटावमध्ये अनेक मुद्दे आहेत. मतदारसंघातील सर्व गावांमधील टँकर बंद करणे व शेतीला शाश्वत पाणी मिळावे, यासाठी विविध योजनेतील व पावसाचे पाणी सर्व गावांना समान वाटप करण्यासाठी वॉटरग्रीन प्रोजेक्ट राबविणार आहे. याबाबतचा आराखडा माझ्याकडे तयार असून, यातून तालुक्यातील सर्व बंधारे, पाझर तलाव, नालाबांध वर्षातून तीनवेळा भरले जातील. अशाप्रकारे सर्व गावे पाणीदार करण्यासाठी माझे प्राधान्य राहील.
’ प्रश्न : पाच वर्षांत आपल्याकडून कोणती कामे झाली ?उत्तर - मी शेवटच्या टप्प्यात जलसंधारण विभागाचा सचिव असताना जलयुक्त शिवार कल्पना शासनापुढे मांडली. यातून मोठ्या प्रमाणात साखळी सिमेंट बंधारे झाले. यामुळे राज्यात पहिल्या टप्प्यात ४७०० गावे टँकरमुक्त झाली. सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेसाठी अभिनेता अमीर खान यांना प्लॅन दिला. त्यामुळे माण-खटावमधील लोकांचा सहभाग आणि संस्थांच्या मदतीने २०० कोटी रुपयांची कामे झाली आहेत.
’ प्रश्न : विरोधक प्रचारात वापरत असलेल्या मुद्द्यांना उत्तर काय ?उत्तर - माझी लढाई कोणत्याही व्यक्तीशी नाही तर ती प्रवत्ती विरोधात आहे. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून निवडणूक वेगळ्या दिशेने न्यायची हे विरोधकाची नीती आहे. मात्र, विरोधकांच्या आरोपाला उत्तर देण्यापेक्षा मी केलेले काम व माझा संकल्प हे विकासाचे मुद्दे घेऊन मी प्रचाराची वाटचाल करीत आहे.
’प्रश्न : मतदारसंघातील कोणते पाच प्रश्न प्राधान्याने सोडवणार ?उत्तर - चांगले शिक्षण, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, वॉटरग्रीन प्रोजेक्ट, अद्ययावत क्रीडा संकुल, मोठ्या प्रमाणात उद्योग उभे करणार आहेत.
’ प्रश्न : बेरोजगारी दूर करणे आणि नवीन उद्योग येण्यासाठी काय प्रयत्न करणार ?उत्तर - मी पुण्यामध्ये असताना छत्रपती शाहू महाराज किमान कौशल्य अभ्यासक्रम दिला. दहा हजार मुलांना यातून शिक्षण दिले. त्यामुळे यामधून ७ हजार मुले नोकरी व उद्योगधंद्याला लागली. तोच अभ्यासक्रम माण-खटावमध्ये आणून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. माण-खटावमध्ये मोठी जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी पाच हजार एकरावर एमआयडीसी आणून मोठे उद्योग आणल्यास छोटे उद्योगही तयार होऊ शकतील, अशी माझी कल्पना आहे.
माण-खटावमध्ये डाळिंब, ज्वारी, कांद्याचे उत्पादन चांगल्या प्रमाणात होते. त्यामुळे सांगोल्याच्या धर्तीवर प्रक्रिया उद्योग उभा केल्यास शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील. - प्रभाकर देशमुख