रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील वाठार-किरोली ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनलने सत्तापरिवर्तन केले. यानिमित्ताने ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला असून, सरपंचपदी सुनील कांबळे यांची, तर उपसरपंचपदी शंकर गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वाठार-किरोली ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री अंबामाता ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने १०-३ अशा फरकाने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संभाजीराव गायकवाड व भाजप पुरस्कृत असणाऱ्या श्री अंबामाता जनशक्ती पॅनेलचा दारुण पराभव केला.
सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत अनसूचीत जातीचे आरक्षण पडल्याने सुनील कांबळे यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली, तर उपसरपंचपदी शंकर गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद यमगर, कृषी सहायक जे. डी. गायकवाड यांच्याहस्ते, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र निकम, तलाठी राहुल होनराव यांच्या उपस्थितीत नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार ज्ञानदेव गायकवाड, शिवाजी माळी, उषा गायकवाड, स्नेहल शिंदे, अनिता पिसे, मनीषा गुजले, सुनंदा गायकवाड, मालन पवार, मंगल खामकर, धर्मेंद्र गायकवाड व रेवणसिध्द जंगम यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो : ०२वाठार किरोली
वाठार-किरोली (ता. कोरेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. (छाया : जयदीप जाधव)