म्हसवड : माण तालुक्यात काही भागांत खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मान्सूनपूर्व वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्याने यंदाचा खरीप हंगाम हाती लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी लागणाऱ्या खते, बी-बियाण्यांच्या किमती पेक्षा चढ्या दराने खत दुकानदारांकडून विक्री सुरू असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. त्यामुळे ‘निसर्गाने तारले... खत दुकानदारांनी मारले...,’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.दुष्काळी माण तालुक्यात बहुतांशी भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने गत पाच-सहा वर्षांत खरीप हंगाम हाती न लागलेल्या बळीराजाच्या यंदाचा तरी खरीप हंगाम हाती लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्यासाठी खते, बी-बियाणे, फळबागांना लागणारी औषधे खरेदीची लगबग सुरू असून, याचाच गैरफायदा काही दुकानदारांकडून घेतला जात आहे. खते, बी-बियाणे, औषधे, खरेदीची पावती शेतकऱ्यांनी मागूनही न देता एमआरपीपेक्षा जास्त भावाने राजरोस बळीराजाची लूट सुरू आहे. खत दुकानदारांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तालुक्यात अस्तित्वात आहे की नाही? याला त्यांची मूक संमती आहे की काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तरी संबंधित यंत्रणेने बळीराजाला दिलासा देण्यासाठी चढ्या भावाने खते, बी-बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी बळीराजाकडून केली जात आहे. एखाद्याने एमआरपीपेक्षा जादा पैसे देण्यास असमर्थता दाखवल्यास संबंधित दुकानदार त्याला खते, बी-बियाणे उपलब्ध असूनही देत नसल्याच्या अनेक घटना घडल्याने दुष्काळी माणचा बळीराजा तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत आहे . (प्रतिनिधी)गेल्या अनेक वर्षांत मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया गेला होता. यंदा मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिल्याने खरिपाच्या पेरण्या केल्या. त्यासाठी लागणारी खते, बी-बियाणे चढ्या भावाने विकली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे. - बाळासाहेब माने, शेतकरी
लहरी निसर्गाने तारले... ...दुकानदारांनी मारले !
By admin | Published: July 04, 2016 9:43 PM