फलटण : फलटण तालुक्यात चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राजे गटाने बाजी मारली. खासदार गटानेही काही ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या असल्या तरी मतदारांनी दोन्ही गटांच्या लादलेल्या नेतृत्वाला घरचा रस्ता दाखविला आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या तर १३८ सदस्य बिनविरोध निवडून आले होते.
येथील शासकीय गोडाऊनमध्ये सोमवारी मतमोजणीला सुरुवात झाली. गोडाऊनबाहेर हजारो कार्यकर्ते निकालाच्या उत्सुकतेसाठी गोळा झाले होते. बहुचर्चित कोळकी ग्रामपंचायतीचा निकाल सर्वप्रथम बाहेर आला. कोळकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यामध्ये राजेगटाने सतरापैकी बारा जागा जिंकल्या चार ठिकाणी राजे गटाचे बंडखोर निवडून आले. भाजपला येथे भोपळाही फोडता आला नाही. राजे गटाने प्रतिष्ठतेच्या केलेल्या तुषार नाईक-निंबाळकर यांना मतदारांनी बाजूला सारताना राजे गटाला लादलेले नेतृत्व स्वीकारणार नसल्याचा सूचक इशाराही दिला.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम पॅनेलचे सर्व उमेदवार पराभूत झाले. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मोठे पद आणि ताकद देऊनही शिंदे यांना यश मिळविता आले नाही. उलट भाजपचे तुकाराम शिंदे यांनी वाखरी ग्रामपंचायतीत भाजपचा झेंडा रोवत ग्रामपंचायत राजे गटाकडून ताब्यात घेतली आहे. निंभोरे ग्रामपंचायतीत राजे गटाने सत्ता परिवर्तन करीत खासदार गटाला धक्का दिला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक मुकुंद रणवरे यांनी निंभोरेची सत्ता पुन्हा ताब्यात घेतली आहे.
साखरवाडी ग्रामपंचायतीत मतदारांनी नाट्यमय घडामोडी घडविल्या. विद्यमान सरपंच विक्रम भोसले यांनी राजे गटाशी बंडखोरी करीत स्वतःचे पॅनेल उभे केले होते. त्यांच्या पॅनेलला सतरापैकी आठ जागा मिळाल्या असून राजे गटाला सात जागा तर प्रल्हादराव पाटील गटाला दोन जागा मिळाल्या आहेत. येथे प्रल्हादराव पाटील गट किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे. सरडे येथे परिवर्तन करीत राजे गटाने पुन्हा एकहाती सत्ता ताब्यात घेतली आहे.
राजाळे ग्रामपंचायतीमध्ये माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी परिवर्तन घडवत राजे गटाचा पराभव करीत तेरापैकी अकरा जागा आपल्या गटाच्या ताब्यात घेतल्या आहेत. निंबळक ग्रामपंचायत उद्योजक राम निंबाळकर यांनी पुन्हा ताब्यात ठेवत राजे गटाचा पराभव केला. फरांदवाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन खासदार गटाची सरशी झाली आहे. टाकळवाडे ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन होऊन राजे गटाची सत्ता आली आहे. मुळीकवाडी येथे शिवसेनेचा एक सदस्य निवडून आला आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव हे गुणवरे ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
चौकट
सत्तरहून अधिक ग्रामपंचायतींवर दावा
काही ग्रामपंचायतींमध्ये राजे गटाच्या अंतर्गत लढती झाल्या. ढवळ येथे राजेगट अंतर्गत दोन गटांतच लढत होऊन प्रस्थापितांना जनतेने घरी बसवीत. राजे गटातीलच नवीन नेतृत्वाला संधी दिली आहे कोळकी आणि सासकल येथील दोन उमेदवार समसमान मते पडल्याने चिठ्ठीवर निवडून आले आहेत. राजे गटाने सत्तरहून अधिक ग्रामपंचायत जिंकल्याचा दावा केला आहे तर खासदार गटाने १४ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.