देऊरची झेडपी शाळा बंद पडण्याच्या मार्गावरमुख्याध्यापकपद गेले; आता शाळेच्या इमारतीचीही होतेय दुरवस्थाआॅनलाईन लोकमतवाठार स्टेशन (सातारा) : शैक्षणिक पंढरी म्हणून राज्यात नावलौकिक असलेल्या कोरेगाव तालुक्यातील देऊर गावची १८७२ मध्ये स्थापन झालेली जिल्हा परिषद मराठी शाळा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आजपर्यंत अनेक गुणवंत घडवण्याची किमया केलेल्या या शाळेची आता मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पटसंख्या घटल्याने या शाळेचे मुख्याध्यापकपद अगोदरच गेले आहे, तर आता असलेल्या शाळेचे एका बाजूने बांधकाम ढासळल्याने ही शाळाच आता शिल्लक राहील का नाही, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. ह्यआमदार आदर्शह्ण गावातील या प्राथमिक शाळेची जर ही अवस्था असेल तर गाव कधी आदर्श होणार, हाच खरा प्रश्न आहे.१८७२ मध्ये स्थापन झालेल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यावेळी जवळपास ११ वर्ग खोल्यांतून शिक्षण दिले जात होते. मात्र, मागील चार-पाच वर्षांत मुलांची संख्या घटल्याने आता मुख्याध्यापकाविना केवळ चार शिक्षक या ठिकाणी अध्यापनाचे काम करीत आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे १५० मुलांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकपद रद्द असल्याने या शाळेचे हे पद रद्द झाले आहे. यातच या शाळेची बुद्धिमता चांगली असली तरी या शाळेस ह्यआयएसओह्ण मानांकन मिळण्यासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधांचा अभाव असल्याने ही शाळा अद्याप ह्यकह्ण दर्जामध्ये गणली जाते.या शाळेतील मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, शौचालय, पाणी या सर्वच गोष्टींचा अभाव आहे. तर तुलनेने याच गावात या शाळेशिवाय मुधाई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाची शाळा. व्यवसाय अभ्यासक्रम असणारी शाळा, शेतीशाळा, पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे महाविद्यालय असे सर्वसमावेशक शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. तर जवळपास सात अंगणवाड्या ही कार्यरत आहेत. या असलेल्या विविध शाळांमुळेच या गावचे नाव शिक्षण क्षेत्रात अग्रणी आहे. असे असले तरी गावची शान असलेली जिल्हा परिषद शाळा बंद पडली तर सर्वाधिक मोठे नुकसान या गावचे होणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी ही शाळा वाचवण्यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे.नवीन बांधकाम ढासळू लागले...साधारण २००३ ते २००४ मध्ये या ठिकाणी नव्याने बांधलेल्या या शाळेचे बांधकाम आता ढासळू लागल्याने ही शाळा पडण्याची भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणची भिंत कोसळल्यानंतर गेली वर्षभर पाठपुरावा करूनही अद्याप या समस्येकडे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने आता ही शाळा वाचवणे गरजेचे झाले आहे.
देऊरची झेडपी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर
By admin | Published: March 09, 2017 2:02 PM